कोकणवासीयांना घडणार चांद्र सफर, ऐन गणेशोत्सवात होणार खड्ड्यांतून उडत प्रवास

प्रातिनिधिक फोटो

मुंबई-गोवा महामार्गाचे काम 12 वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची चाळण होत आहे. यावर्षीदेखील हीच स्थिती कायम असल्याने लाखो चाकरमान्यांचा ऐन गणेशोत्सवाचा प्रवास खड्डय़ातूनच होणार आहे. या खड्डय़ांची स्थिती भयंकर असल्याने गणपतीला कोकणात जाणाऱया कोकणवासीयांना अक्षरशः ‘चांद्र सफर’च घडणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, इंदापूर विभाग, चिपळूण, आरवली, संगमेश्वर, हातखंबा अशा कित्येक भागातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर-माणगाव बाह्यवळण, पळस्पे इंदापूर पट्टय़ातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल आदी ठिकाणी चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरूच झाले नसल्यामुळे या परिसरात वाहनचालकांना कित्येक तास वाहतूककाेंडीत अडकावे लागत आहे.

पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्याचीही अक्षरशः चाळण झाली आहे. यातच गणपतीसाठी मुंबईतून हजारो गाडय़ा जाणार असल्याने कोकणवासीयांची रखडपट्टी होणार आहे.

पर्यायी मार्गामुळे भुर्दंड

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रवास टाळण्यासाठी अनेक वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करीत आहेत. मात्र यामुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होत आहे. इंधनासाठी जादा खर्च करावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या रस्त्याची गणेशोत्सवाआधी डागडुजी करावी, अशी मागणीही चाकरमानी आणि कोकणवासीयांकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.