दोनदा विश्वविजेता ठरलेला भारत 2026 मध्ये ट्रॉफी जिंकू शकणार नाही, माजी विश्वविजेत्याचा मोठा दावा!

यूपी टी-20 लीगमध्ये रिंकू सिंगच्या (Rinku Singh) धमाकेदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा माजी विश्वविजेता कृष्णमाचारी श्रीकांत (Krushnamachari Shrikant) यांचं ते वक्तव्य व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी केवळ निवडीवर नाराजी व्यक्त केली नाही, तर 2026 टी-20 वर्ल्ड कपबाबत मोठी भविष्यवाणीही केली.

भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील आक्रमक सलामीवीर असलेल्या श्रीकांत यांनी आपल्या मुलासोबत यूट्यूब चॅनलवर असा दावा केला की, ज्यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची झोप उडू शकते. माजी कसोटीपटू आणि विश्वविजेता श्रीकांत आशिया कपसाठी (Asia Cup) निवडलेल्या सध्याच्या भारतीय संघाबद्दल नाराज दिसत आहेत. त्यांनी 2026 वर्ल्ड कपमधील भारताच्या यशावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

श्रीकांत यांनी यूट्यूब चॅनल ‘चिकी चिका’वर आपल्या मुलगा आणि माजी क्रिकेटर अनिरुद्ध श्रीकांत याच्याशी बोलताना आशिया कपच्या टीम इंडियाबाबतची नाराजी व्यक्त केली आणि त्यावरूनच 2026 टी-20 वर्ल्ड कपसाठीही भाकीत केलं.

आशिया कपमधील भारताच्या यशावर त्यांनी शंका व्यक्त केली नाही. उलट त्यांचं मत आहे की, भारत आशिया कप जिंकूही शकतो, पण भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये यश मिळवू शकणार नाही. पुढील वर्षीच्या वर्ल्ड कपबाबत श्रीकांत यांनी कठोर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं, कदाचित या संघासोबत आपण आशिया कप जिंकू, पण या संघासोबत आपण 2026 वर्ल्ड कप जिंकू शकत नाही. सहा महिन्यांवर असलेल्या वर्ल्ड कपसाठी हीच आपली तयारी आहे का?

आशिया कपच्या टीम निवडीबाबत श्रीकांत यांना विशेष नाराजी होती, ती म्हणजे सूर्यकुमार यादवला (Suryakumar yadav) कर्णधार आणि शुबमन गिलला (Shubman gill) अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी उपकर्णधार बनवणं. गिलने शेवटचा टी-20 सामना जवळपास वर्षभरापूर्वी 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

आशिया कप टीम निवडीनंतरच श्रीकांत यांनी नाराजी दर्शवली होती. त्यांनी विधान दिलं होतं, टीम निवडीबाबत आपण मागे चाललो आहोत. रिंकू सिंग, शिवम दुबे आणि हर्षित राणा संघात कसे आले हे मला कळलं नाही. IPL हा निवडीचा आधार असतो, पण निवडकर्त्यांनी त्याआधीच्या कामगिरीला निकष मानल्यासारखं वाटतं.

अर्थातच, श्रीकांत यांची ही भविष्यवाणी रिंकू सिंगसारखा खेळाडू चुकीची ठरवू शकतो. रिंकू सिंग हा फाईटर खेळाडू आहे. सध्या तो यूपी टी-20 लीगमध्ये शतक आणि अर्धशतक ठोकून धडाकेबाज कामगिरी करत आहे आणि आशिया कपसाठीची आपली तयारी पक्की करत आहे.

Comments are closed.