नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, सिंधुदुर्गात चीड आणणारा प्रकार


सावंतवाडी : ओंकार हत्तीला (Omkar elephant) काही दिवसांपूर्वीच दांड्याने मारल्याचा प्रकार ताजा असतनाच आता बांदा येथे सुतळी बॉम्ब तसेच फटाके टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ओंकार हत्ती (Omkar elephant) तुळसाण येथील नदीत आंघोळ करत असताना त्याच्यावरती सुतळी बॉम्ब तसेच फटाके टाकण्यात आले आहेत. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.(Omkar elephant)

Omkar Elephant: या सर्व घटनेवेळी ओंकार हत्ती घाबरला असल्याचं दिसून आलं

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्ती नदीच्या पाण्यात शांतपणे अंघोळ करत असताना काही व्यक्तींनी त्याच्या शेजारीच पाण्यात चक्क ॲटम बॉम्ब फेकले. त्या आवाजाने आणि फटाक्यांमुळे ओंकार हत्ती भेदरल्याचं दिसून आलं. तो फटाक्यांच्या आवाजाच्या भीतीने पाण्याच्या काठापासून पाण्याच्या आतल्या बाजुला जाताना दिसतो, ही घटना बांदा येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला असून प्राणी प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे, या घटनेनं प्राणीप्रेमी आक्रमक झाले असून या संतापजनक कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. बॉम्ब फेकून हत्तीला इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्राणीप्रेमींनी वनविभागासमोर उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केली होती, त्यानंतर आता चक्क ॲटम बॉम्ब फेकले आहेत. फटाके वाजल्यानंतर तिथे असलेल्या आणि हे संतापजनक कृत्य करणाऱ्यांनी मोठ्याने आवाज केला, या सर्व घटनेवेळी ओंकार हत्ती घाबरला असल्याचं दिसून आलं.

आधी दांड्याने मारहाण झाल्यानंतर तो हत्ती थोडा बिथरला होता. तो अनेकांचा पाठलाग करत आहे. त्यानंतर आता पाण्यात शांतपणे अंघोळ करत असताना त्याच्या अंगावर फटाके फेकण्याचा प्रकार झाल्यामुळे असाच प्रकार सुरू झाल्यास तो चिडल्यास त्याच्याकडून मनुष्य आणि किंवा जीवितहानी होऊ शकते, अशी शक्यताही प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Omkar Elephant:  काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण

काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे प्राणीप्रेमी कडून संताप व्यक्त केला जात होता.व्हायरल व्हिडीओमध्ये ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण करताना दिसत होते. रात्रीच्या वेळी वनविभागाच्या टीम समोर दांड्याने झालेली मारहाणीचा प्रकार घडला होता. हत्तींच्या संरक्षणासाठी WLPA च्या कलम ४३ नुसार हत्ती हा अनुसूची १ चा प्राणी आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ आणि हत्ती संरक्षण कायदा, १८७९. वन्यजीव (संरक्षण) नुसार त्यांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. हत्ती संरक्षण कायदा, १८७९ च्या कलम ९ मध्ये वन्य हत्तींना मारण्यास, जखमी करण्यास मनाई करणारी तरतूद आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० मध्ये प्राण्यांना अनावश्यक त्रास देणे हा गुन्हा मानला जातो. या कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला अनावश्यक त्रास देणे, मारहाण करणे, छळ करणे किंवा त्यांना वेदना होईल अशा कोणत्याही कृती करणे गुन्हा आहे. या नुसार सदर प्रकरणाची वनविभागाने सखोल चौकशी करून ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्राणी मित्र करत आहेत. अशातच आता या घटनेमुळेही कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.