बंगालच्या उपसागरात दोन बोटी उलटल्या.

500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती

वृत्तसंस्था/सिडनी

म्यानमारमधून रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात उलटल्या. संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्था (युएनएचसीआर) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (आयओएम) यांच्या माहितीनुसार, दोन्ही बोटींमध्ये अंदाजे 530 लोक होते. या दुर्घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘युएनएचसीआर’ आणि ‘आयओएम’च्या माहितीनुसार, दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या रखाइन राज्यातून निघाल्या होत्या. यातील बहुतेक प्रवासी रोहिंग्या होते, तर काही बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमधूनही आले होते.

पहिली बोट निघाल्यानंतर लगेचच संपर्काबाहेर गेली. त्यात अंदाजे 250 लोक होते. दुसऱ्या बोटीमध्ये अंदाजे 280 लोक होते. ही बोट 8 जुलै रोजी म्यानमारच्या इरावदी किनाऱ्याजवळ बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  या घटना आणि जीवितहानीचा तपशील अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेला नसला तरी, मोठ्या जीवितहानीच्या शक्यतेबद्दल युएनएचसीआर आणि आयओएम अत्यंत चिंतित आहेत, असे या संस्थांनी म्हटले आहे. सध्या अंदाजे 12 लाख रोहिंग्या बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमध्ये राहतात. गेल्या काही वर्षांत समुद्रातून स्थलांतर करताना हजारो रोहिंग्यांनी आपले प्राण गमावले आहेत.

Comments are closed.