म्हसळ्यात दोन लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बेड्या; एसीबीची कारवाई, घराच्या कामात अडथळा न आणण्यासाठी मागितले चार हजार
घरबांधणीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी चार हजारांची लाच घेताना खारगाव खुर्द ग्रामपंचायतीतील दोन लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. कृषी अधिकारी बबन कांबळे आणि ग्रामपंचायत अधिकारी कोमल बेनवाड अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. अॅण्टी करप्शन विभागाच्या या तडाख्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
खारगाव खुर्द गट ग्रामपंचायतमधील कृषी अधिकारी बबन कांबळे आणि ग्रामपंचायत अधिकारी कोमल बेनवाड यांनी तक्रारदाराकडून घरबांधणीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी चार हजार रुपये मागितले. तक्रारदाराने याची तक्रार रायगड-अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर एसीबी पथकाने या घटनेची गुप्त पद्धतीने पडताळणी केली. यावेळी आधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
बदलापुरातही कारवाई
बदलापूर : चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात बेकायदा पद्धतीने कागदपत्रांची हेराफेरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामसेवकासह दोघांविरोधात कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली आहे. या घटनेमुळे चामटोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Comments are closed.