गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना दोन वृद्धांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश, पंजाबमधील घटना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे देशभरात एलपीजीचा तुटवडा वाढत चालला आहे. याचदरम्यान गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहून दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथील 76 वर्षीय मोहम्मद मुख्तियार आणि पंजाबमधील बर्नाला येथील शैना गावातील 66 वर्षीय भूषण कुमार मित्तल यांचा समावेश आहे. दोघांचाही हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बिहारमध्ये गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे लाकूड आणि कोळशाची मागणी वाढली आहे. राजस्थानमधील हॉटेल्स लाकडाच्या माध्यमातून चुलीवर स्वयंपाक करत आहेत. याचदरम्यान उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे गॅस सिलिंडर घेण्यासाठी रांगेत उभे असताना मोहम्मद मुख्तियार (76) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्तियार एजन्सीमध्ये आले होते. रांगेत उभे असताना ते अचानक कोसळल्यानंतर काही वेळातच त्यांनी प्राण सोडला.
सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी छापासत्र
एकीकडे गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांचा संघर्ष सुरू असताना काही भागात गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि साठवणूकही केली जात आहे. अनेक ठिकाणी 2,000 रुपयांचे व्यावसायिक सिलिंडर 4,000 रुपयांना विकले जात आहेत. सिलिंडर जप्त करण्याचे कामही सुरू आहे. हे रोखण्यासाठी सरकार मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील गोदामांवर छापे टाकत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्याचे निर्देश दिल्यानंतर आता राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या भागात कारवाईचे सत्र सुरू झाले आहे.
Comments are closed.