आंध्रमध्ये एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग
एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू : प्रवाशांनी साखळी ओढून थांबवली ट्रेन
वृत्तसंसस्था/ शाखापट्टणम
आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमपासून सुमारे 66 किमी अंतरावर येलमंचिली येथे टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याने एकाचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर 12:45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक्स्प्रेसच्या दोन एसी डब्यांना आग लागल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रसंगी सदर रेल्वे अनकापल्ले येथील येलमंचिली रेल्वेस्थानकावर पोहोचली होती. दुर्घटनेवेळी एका डब्यात 82 आणि दुसऱ्या डब्यात 76 प्रवासी होते. प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवत स्वत:चा बचाव केला.
आगीच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी कोच बी1 मधून एक मृतदेह बाहेर काढला. मृताची ओळख 70 वर्षीय चंद्रशेखर सुंदरम अशी झाली आहे. जळालेले डबे वेगळे करून एक्स्प्रेस एर्नाकुलमला पाठवण्यात आली. आगीचे कारण शोधण्यासाठी दोन फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आग प्रथम टाटानगर एर्नाकुलम एक्सप्रेसच्या कोच बी1 मध्ये लागली. त्यानंतर ती एम2 मध्ये पसरली. आगीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढत ट्रेनमधून पळ काढला. मात्र, दोन्ही डबे प्रवाशांच्या सामानासह जळाले.
Comments are closed.