इराणच्या न्यायालयात गोळीबार, दोन न्यायाधीशांचा मृत्यू; हल्लेखोराची आत्महत्या
प्रत्येक राष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, इराणमध्ये थेट सर्वोच्च न्यायालयात गोळीबार झाला असून, या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेने इराण हादरले असून, गोळीबारानंतर हल्लेखोराने आत्महत्या केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे प्रवक्ते असगर जहांगीर यांनी सांगितले की, न्यायाधीशांना त्यांच्या खोलीत घुसून मारण्यात आले. दोन्ही न्यायाधीश राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि हेरगिरीशी संबंधित खटल्यांची सुनावणी करत होते.
या संपूर्ण घटनेत आणखी एक न्यायाधीश जखमी झाला आहे. याशिवाय एका अंगरक्षकालाही दुखापत झाली आहे. अहवालानुसार, स्थानिक ळेनुसार सकाळी 10.45 वाजता हा हल्ला झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांना लक्ष्य करण्यात आले. मारल्या गेलेल्या न्यायाधीशांची ओळख अली रजनी आणि मोगीसेह अशी झाली आहे. ते इराणी न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ न्यायाधीशांपैकी एक होते. मृत्युदंडाच्या शिक्षेच्या संख्येमुळे दोघांनाही ‘हँग मॅन’ म्हणून ओळखले जात असे.
हल्लेखोर हा न्याय विभागाचाच कर्मचारी होता. तेहरान कोर्ट हाऊसमधून अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यामागील हेतू शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 1988मध्ये रजनी यांच्या हत्येचाही प्रयत्न करण्यात आला होता. त्यादरम्यान, त्यांच्या दुचाकीमध्ये मॅग्नेटीक बॉम्ब ठेवण्यात आला.
त्याचवेळी, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या मते, दुसरे न्यायाधीश मोगीसेह यांच्यावर 2019 मध्ये अमेरिकेने बंदी घातली होती. इराण हा जगात सर्वाधिक फाशीची शिक्षा देणाऱ्या देशांपैकी एक आहे. अल्पवयीन मुलांसाठी मृत्युदंडाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या करारावर स्वाक्षरी करूनही, इराण सर्वाधिक मृत्युदंड देणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मृत्युदंड देण्यास मनाई आहे
Comments are closed.