उत्तर प्रदेशात दोन आयएसआय ऑपरेटिव्ह अटक
ड्रोन अन् गगनयान प्रकल्पाची पाठवत होते माहिती
वृत्तसंस्था/ आग्रा
उत्तरप्रदेश एटीएसने आग्रा येथून ऑर्डिनेन्स फॅक्ट्री फिरोजाबादचे चार्जमन रविंद्र कुमार आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. रविंद्र हा आयएसआयसाठी हेरगिरी करत होता आणि पाकिस्तानातील हँडलरला फॅक्ट्रीशी संबंधित गोपनीय दस्तऐवज पाठवित होता.
आयएसआयच्या महिला एजंटने फेसबुकवर ‘नेहा शर्मा’ नावाने बनावट अकौंट तयार करत रविंद्र यांना जाळ्यात अडकविले होते, संभाषणादरम्यान महिलेने आपण पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचे नमूद केले होते. पैशांच्या प्रलोभनाला बळी पडत रविंद्रने दैनंदिन उत्पादन अहवाल, स्क्रीनिंग कमिटीचे गोपनीय पत्र, ड्रोन आणि गगनयान प्रकल्पाशी निगडित माहिती आयएसआयच्या महिला एजंटला पुरविली होती.
मोबाइलमधून मिळाले महत्त्वाचे पुरावे
रविंद्रच्या मोबाइलमधून ऑर्डिनेन्स फॅक्ट्रीच्या वरिष्ठ अधिकारी, 51 गोरखा रायफल्सचे अधिकारी आणि लॉजिस्टिक ड्रोनच्या परीक्षणाशी निगडित दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच त्याने व्हॉट्सअॅपद्वारे देखील गोपनीय माहिती शेअर केली होती. उत्तरप्रदेश एटीएस याप्रकरणी तपास करत असून आरोपीच्या संपर्कात असलेल्या लोकांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. आयएसआय हस्तकांच्या पूर्ण नेटवर्कचा भांडाफोड करण्याकरता या चौकशीला विस्तृत स्वरुप देण्यात आले असून यात मोठे अन् महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.