मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अनियंत्रित ट्रकची कारला धडक, दोघांचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघाताची घटना रविवारी पहाटे घडली. अनियंत्रित ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोमाटणे फाट्याजवळील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

अपघातग्रस्त ट्रक पुण्याहून मुंबईकडे चालला होता. यादरम्यान कामशेतजवळ पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कारवर ट्रक धडकला आणि उलटला. यात कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. यामुळे मुंबई ते पुणे मार्गावर वाहनांची 10 किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. अपघातग्रस्त ट्रक आणि कार रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे, वेगामुळे की तांत्रिक बिघाडामुळे झाला का याबाबत तपास सुरू आहे.

Comments are closed.