पाच महिन्यांत 25 हजार ठिकाणी आढळला डेंग्यू-मलेरिया, पालिकेने केली 2 लाख उत्पत्तीस्थाने नष्ट
डासांपासून होणारे विविध विषाणूजन्य तसेच संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कीटकनाशक विभागाने गेल्या पाच महिन्यांत डासांची सुमारे 2 लाख 17 हजार 931 उपत्तीस्थाने शोधून ती नष्ट केली. यात 25 हजार 169 ठिकाणी डेंग्यू होणाऱ्या एडिस डासांची उत्पत्तीस्थाने होती. दरम्यान, 5 लाख 90 हजार 444 इमारती व 79 लाख 69 हजार 424 झोपडय़ांमध्ये कीटकप्रतिबंधक धूम्रफवारणी करण्यात आली आहे.
डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यांचा नाश करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कीटकनाशक विभागाकडून उपाययोजना करण्यात येतात. एडिस डास चावल्याने डेंग्यू हा विषाणूजन्य आजार होतो. साचलेल्या स्वच्छ पावसाच्या पाण्यातदेखील डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव मुंबई शहर व उपनगरात वाढतो. यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि कीटकनाशक विभागामार्फत विविध उपाययोजना तसेच जनजागृती व प्रबोधन करण्यात येते.
अॅपलघुपटातून जनजागृती
राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे 2025 च्या निमित्ताने ‘तपासा, स्वच्छ करा, झापून ठेवा-डेंग्यूला हरवण्याचे उपाय करा’ हे घोषवाक्य आहे. त्यानुसार महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने तंत्रज्ञानावर आधारित पुढाकार घेतानाच ‘भाग मच्छर भाग’ आणि ’मुंबई अगेन्स्ट डेंगी’ या मोबाईल अॅपचा पर्याय मुंबईकरांना दिला आहे. हिवताप (मलेरिया), डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
आतापर्यंत डेंग्यूचे 311 रुग्ण
मुंबईत 2024 मध्ये डेंग्यूचे एपूण 5 हजार 906 रुग्ण आढळले होते, मात्र गेल्या पाच महिन्यांत मुंबईत डेंग्यूचे केवळ 311 इतके रुग्ण मर्यादित आहेत. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांमुळे होणाऱ्या विविध आजारांची संख्या वाढत जाते. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशक विभागाकडून वेळोवेळी धूम्रफवारणी तसेच इतर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
महापालिकेचे आवाहन
तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या, परिसरात स्वच्छता ठेवा. टिन, टायर, नारळाच्या करवंटय़ांमध्ये साचणारे पाणी टाळा, आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळा. पाण्याची भांडी रिकामी करा व स्वच्छ करा, फुलदाण्या, कुंड्यांतील पाणी बदलत रहा, डास प्रतिबंधक फवारणी केलेल्या मच्छरदाणीचा उपयोग करा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने केले आहे.
Comments are closed.