श्रीलंका-बांग्लादेश सामन्याआधी पाळण्यात आलं 2 मिनिटांचं मौन! जाणून घ्या नेमकं कारण

आशिया कप 2025 (Asia Cup) स्पर्धेमध्ये सुपर-4 टप्प्यातील पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू होण्याआधी 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले. हे मौन श्रीलंकन खेळाडू दुनिथ वेल्लालागेच्या स्वर्गीय वडिलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले, ज्यांचे गेल्या गुरुवारी अचानक निधन झाले होते.

बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी मौन पाळून दुनिथ वेल्लालागे यांच्या वडिलांप्रती संवेदना व्यक्त केली. याच सन्मानार्थ श्रीलंकन खेळाडूंनी काळी पट्टी बांधून सामना खेळला. वेल्लालागे वडिलांच्या निधनानंतरही सुपर-4 मधील सामना खेळून देशसेवेचे मोठे उदाहरण घालत आहेत.

21 वर्षीय युवा खेळाडू दुनिथ वेल्लालागे वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच तातडीने आपल्या देशात परतला होता. पण आता तो पुन्हा संघात सामील झाला आहे. माजी दिग्गज खेळाडू रसेल आर्नोल्डदेखील वेल्लालागेच्या राष्ट्रीय संघाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक करत आहे. मैदानावर प्रेक्षकांनीही उभे राहून दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. अलीकडेच एक व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यात वेल्लालागे आपल्या कुटुंबीयांना निरोप देताना दिसत होता. वेल्लालागे डावखुरा फिरकी गोलंदाज असून तो आज सकाळीच UAE मध्ये पुन्हा संघात सामील झाला.

दुनिथ वेल्लालागे हा तोच गोलंदाज आहे, ज्याच्या एका षटकात अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीने 5 षटकार ठोकले होते. मात्र सामना संपल्यानंतर जेव्हा नबींना वेल्लालागे यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल माहिती मिळाली तेव्हा तोही दुःखी झाला. श्रीलंकेने तो सामना जिंकत सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला होता.

Comments are closed.