एनडीएच्या बाजूने आणखी दोन एक्झिट पोल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा द्वितीय आणि अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर मंगळवारी बहुतेक सर्व मतदानोत्तर सर्वेक्षण करणाऱ्या संस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होईल, असा निष्कर्ष काढला आहे. बुधवारी आणखी दोन सर्वेक्षण संस्थांनी त्यांचे निष्कर्ष घोषित केले असून त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनेच ही निवडणूक जात आहे अशी शक्यता व्यक्त केली आहे.
अॅक्सिस माय इंडिया या संस्थेने बिहारमध्ये चुरशीचा संघर्ष असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बिहार विधानसभेच्या एकंदर 243 स्थानांपैकी 121 ते 141 स्थाने मिळतील. तर महागठबंधनला 98 ते 108 स्थाने मिळतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 43 टक्के तर महागठबंधनला 41 टक्के मते मिळतील, असेही भाकित बुधवारी या सर्वेक्षण संस्थेने केले आहे.
‘टुडेज चाणक्य’चे सर्वेक्षण
‘टुडेज चाणक्य’ या सर्वेक्षण संस्थेनेही आपल्या मतदानोत्तर सर्वेक्षणाचा निष्कर्ष घोषित केला आहे. या निष्कर्षानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बिहार विधानसभेच्या एकंदर 243 स्थानांपैकी 148 ते 172 स्थाने मिळतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 44 टक्के मते मिळतील, असेही हे सर्वेक्षण स्पष्ट करत आहे. महागठबंधनला 65 ते 89 स्थाने मिळतील. तसेच 38 टक्के मते मिळतील, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष दिसून येत आहे.
Comments are closed.