झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले
10 लाख रुपयांचे बक्षीस असलेला जेजेएमपी प्रमुख ठार
वृत्तसंस्था/रांची
झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत झारखंड जनमुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) प्रमुख नेता पप्पू लोहारा यांच्यासह दोन नक्षलवादी ठार झाले. पप्पूवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पप्पू लोहारा आणि जेजेएमपीचा आणखी एक सदस्य प्रभात गंजू चकमकीत मारला गेल्याचे सुरक्षा दलाकडून जाहीर करण्यात आले. तसेच या गटातील आणखी एक सदस्य जखमी झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे.
लातेहार पोलीस स्टेशन परिसरातील इचाबर जंगलात शनिवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. लातेहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान नक्षलवादी गट जेजेएमपीचा प्रमुख लोहारा आणि त्याचा आणखी एक सहकारी मारला गेला, असे पलामूचे पोलीस उपमहानिरीक्षक वाय. एस. रमेश यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. लोहारा आणि त्याचे साथीदार जंगलात असल्याची माहिती मिळताच लातेहारचे पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पथकाने शोधमोहीम राबविल्यानंतर चकमक झाल्याचे सांगण्यात आले. या संघर्षात सुरक्षा दलाला कोणताही मोठा फटका बसलेला नाही.
Comments are closed.