नेपाळ सीमेवरून दोन पाकिस्तानी संशयितांना अटक

उच्चशिक्षित महिला डॉक्टरचाही समावेश : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सतर्क झालेल्या सुरक्षा यंत्रणांची कारवाई

वृत्तसंस्था/ बहराईच

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. एसएसबी आणि पोलिसांच्या संयुक्त तपासणी मोहिमेदरम्यान नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक महिला डॉक्टर देखील आहे. त्यांच्या घुसखोरीसंबंधी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अटक केलेल्या व्यक्तींची कसून चौकशी केली. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची तुरुंगात पाठवण्यात आले आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली असून पाकिस्तानी वंशाचा डॉ. हसन अम्मान सलीम आणि सध्या ब्रिटनच्या मँचेस्टरमधील डालमार्टन येथे राहणारी डॉ. सुमित्रा शकील ओलिबिया अशी संबंधितांची नावे आहेत.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर, नेपाळ सीमेला लागून असलेल्या बहराईचच्या तराई जिह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. या दक्षतेनंतर पोलीस आणि एसएसबीसह सुरक्षा यंत्रणा सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान सीमेवर कडक तपासणी मोहीम सुरू असताना दोन परदेशी नागरिक नेपाळच्या सीमेवरून भारतीय सीमांमध्ये घुसखोरी करताना पकडले गेले. या संशयितांना अटक केलेल्या पथकात एसएसबी पार्टी कमांडर जगत दास, राणी कुमारी, टी यमुना आणि ज्योती सिंग यांचा समावेश होता.

नेपाळ सीमेवरून परदेशी नागरिकांना पकडल्याची बातमी मिळताच, अनेक सुरक्षा एजन्सींचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींची अनेक तास चौकशी केली. दोघेही व्यवसायाने डॉक्टर असल्याचे सांगितले जाते. सदर आरोपींविरुद्ध परदेशी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेल्यानंतर तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे स्टेशन हाऊस ऑफिसर रमेश रावत यांनी सांगितले

Comments are closed.