काश्मीरमध्ये दोन सैनिक शहीद झाले

कुलगाममध्ये ‘ऑपरेशन अखाल’ : 1 ऑगस्टपासून नऊ दिवस चालली मोहीम

सर्कल संस्था/ श्रीनगर

रक्षाबंधनाच्या दिवशीच पंजाबमधील दोन सैनिकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. जम्मू काश्मीरमधील कुलगामच्या अखाल जंगलात सुरू असलेल्या चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून इतरांचा शोध सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी सुरू झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांपैकी लान्स नाईक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. हे दोघेही जवान पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती शनिवारी सकाळी समोर आली.

कुलगाममध्ये 1 ऑगस्टपासून ‘ऑपरेशन अखाल’ सुरू करण्यात आले होते. शनिवारी त्याचा नववा दिवस होता. या कालावधीत आतापर्यंत 9 सैनिक जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. हे दोन्ही सैनिक पंजाबच्या वेगवेगळ्या जिह्यांतील आहेत. त्यापैकी एक फतेहगड साहिबमधील मंडी गोविंदगड येथील हरमिंदर सिंग आणि दुसरा प्रितपाल सिंग हा जवान खन्नामधील समराला येथील आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी पंजाबसाठी ही मोठी दु:खद घटना ठरली आहे.

स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफकडून ‘ऑपरेशन अखाल’ राबविण्यात आले. जंगलभागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांची संख्या अद्यापही स्पष्ट करण्यात आलेली नाही. जम्मू काश्मीरमधील कुलगामच्या अखाल वनक्षेत्रात सुरू असलेली चकमक ही खोऱ्यातील सर्वात दीर्घ काळ चाललेल्या दहशतवादविरोधी कारवाईंपैकी एक आहे.

‘ऑपरेशन अखाल’ दरम्यान 2 ऑगस्ट रोजी सकाळी ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पुलवामा येथील हरिस नजीर डार अशी झाली, जो सी-श्रेणीचा दहशतवादी होता. पहलगाम हल्ल्यानंतर 26 एप्रिल रोजी गुप्तचर संस्थांनी ज्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची नावे जाहीर केली होती, त्यांच्या यादीत हरिसचा समावेश होता. त्याच्याकडून एके-47 रायफल, मॅगझिन आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी परिसरात दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली होती. 28 जुलै रोजी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत लिडवासच्या जंगलात सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांना ठार मारले. तर त्यानंतर 31 जुलै रोजी पूंछमधील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीदरम्यान आणखी दोन दहशतवादी मारले गेले होते.

14 पैकी 7 स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांनी 14 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. त्यापैकी आतापर्यंत 7 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. हरिस नजीर वगळता उर्वरित 6 दहशतवादी मे महिन्यात शोपियान आणि पुलवामा येथे झालेल्या चकमकीत मारले गेले. 13 मे रोजी शोपियान येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे शाहिद कुट्टे, अदनान शफी, अहसान उल हक शेख अशी आहेत. 15 मे रोजी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत आमिर नजीर वाणी, यावर अहमद भट आणि आसिफ अहमद शेख यांचा खात्मा करण्यात आला होता.

Comments are closed.