मणिपूर हल्ल्यात दोन सैनिक शहीद झाले
आसाम रायफल्सचा ताफा लक्ष्य : हल्लेखोरांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या विष्णुपूर जिह्यात शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले असून अन्य चार जण जखमी झाले. घटनेची माहिती समजताच पोलीस आणि स्थानिकांनी जखमींना रिम्स रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. तथापि, हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नसून कोणी जबाबदारीही स्वीकारलेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम रायफल्सचे सैनिक इंफाळहून विष्णुपूरला जात असताना नंबोल सबल लीकाई परिसरात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी वाहनावर हल्ला करताना अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले आहेत. सुरुवातीला एक जवान हुतात्मा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अन्य एका जवानाने अखेरचा श्वास घेतल्याने दोघांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नंबोल सबल लीकाई परिसरात झालेल्या या हल्ल्यात 33 व्या आसाम रायफल्सच्या जवानांना लक्ष्य करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला अचानक झाला होता. मात्र तो पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. जखमी सैनिकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट केली आहे. नंबोल सबल लीकाई येथे आपल्या 33 व्या आसाम रायफल्सच्या शूर सैनिकांवर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आहे. दोन सैनिकांना यात प्राण गमवावे लागल्याने सुरक्षा दलाचे मोठे नुकसान झाले आहे. मी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांप्रति माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. त्यांचे धाडस आणि बलिदान नेहमीच आपल्या हृदयात राहील. या घृणास्पद कृत्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
Comments are closed.