कोरोनाचे पुन्हा आक्रमण, केईएममध्ये दोन रुग्णांचा मृत्यू

कोरोनाने पुन्हा एकदा चीन, सिंगापूरमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली असताना मुंबईमध्ये पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोविडबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. संबंधित मृतांवर रुग्णालय प्रशासनाकडून भोईवाडा स्मशानभूमीत आवश्यक काळजी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे समजते.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली होती. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड कमी पडू लागल्याने फिल्ड हॉस्पिटल तयार करून लाखो रुग्णांचा जीव वाचवण्यात आला. तीन वर्षांत तीन लाटा आल्या. यामध्ये पहिल्या दोन लाटांमध्ये मुंबईत शेकडो बळी गेले. यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्यात आल्यामुळे तब्बल तीन वर्षांच्या लढय़ानंतर कोरोनाला पूर्णपणे प्रतिबंध करून प्रसार आटोक्यात आणणे शक्य झाले. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्याने आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
रुग्णालय म्हणते, सहव्याधींमुळे मृत्यू
मृत झालेल्या दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिवाय या रुग्णांमध्ये दीर्घ आणि गंभीर स्वरूपात सहव्याधी होत्या, असेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी आहेत लक्षणे
- कोरोनाची लागण झाल्यास 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दीर्घकाळ असल्यास कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
- कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास गर्दीत जाऊ नये, हस्तांदोलन करू नये, मांस खाऊ नये, मास्क वापरावा, स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवावे अशी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिवसेनेने प्रशासनाला विचारला जाब
परळ विभागातील एका महिला रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांकडे देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारल्यामुळे संबंधित मृत्यू कोविडमुळे झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर आज माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी कार्यकर्त्यांसह केईएम रुग्णालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. कोविडने मृत्यू झाला असल्याचे समोर आले असताना विशेष वॉर्ड किंवा क्वारंटाइन सेंटर का उभारले नाही, असा सवालही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी प्रशासनासोबत उपाययोजनांबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
Comments are closed.