कुलगाममध्ये दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

पिस्तूलसह मॅगझिन, दोन ग्रेनेड जप्त

वृत्तसंस्था / कुलगाम

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिह्यात सुरक्षा दलांनी रविवारी एका तपासणी नाक्यावर शोधमोहिमेदरम्यान दोन संशयित दहशतवादी साथीदारांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल, मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे आणि दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. अटक केलेले दोघेही कुलगामच्या बुगम भागातील रहिवासी असून मुनीब यासीन राथर आणि ताहीर बिलाल अशी त्यांची नावे आहेत. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या 18 व्या बटालियनचे संयुक्त पथक रविवारी सकाळी सुमारे 11:30 वाजता कुलगाममध्ये तपासणी नाक्यावर गस्त घालत होते. तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहताच दोन संशयित तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क सुरक्षा दलांनी त्यांना जागीच पकडले.

प्राथमिक चौकशीनंतर दोघांची ओळख पटली. शोधमोहिमेदरम्यान, मुनीब यासीन राथरकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, तर ताहीर बिलालकडून दोन जिवंत हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. पोलिसांनी कुलगाम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेल्या शस्त्रs आणि स्फोटकांचा स्रोत तसेच त्यांचा संभाव्य उद्देश यासंबंधी खातरजमा केली जात आहे.

Comments are closed.