काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार झाले

कुलगाममध्ये चकमक : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करत घुसखोरीचा मोठा कट उधळून लावला. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिह्यातील अखलच्या जंगली भागात वेढा घालत शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढा घालून ठार केले. या कारवाईनंतर अतिरिक्त फौजफाटा मागवून परिसरात घेराबंदी वाढवण्यात आली आहे. सीमावर्ती भागामध्ये अतिरिक्त सैन्यही तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोघांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती शनिवारी सकाळी देण्यात आली.

या कारवाईपूर्वी 30 जुलै रोजी सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरच्या पूंछ जिह्यातील नियंत्रण रेषेवर ऑपरेशन शिवशक्ती राबवले होते. यामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. चकमकीत मारले गेलेले हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे सदस्य होते. या चकमकीच्या दोन दिवस आधी, सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील जंगलात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते.

Comments are closed.