पाकिस्तानचा ‘तो’ दावा इस्रायलने तातडीने खोडून काढला; युद्धविरामाबाबत स्पष्ट केली भूमिका

इराणसोबतच्या दोन आठवड्याच्या युद्धविरामाच्या अमेरिकेच्या निर्णयाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. नेतन्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान कार्यालयाकडून हे निवेदन पोस्ट करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे इराण विरोधातील कारवाईला विराम देण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला असला तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेला एक दावा त्यांनी खोडून काढला आहे.

नेतन्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इराणकडून अमेरिका, इस्रायल, इराणचे शेजारी देश आणि जगाला असलेला अण्वस्त्र, क्षेपणास्त्र आणि दहशतवादी धोका संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांना इस्रायलचा पाठिंबा आहे.’ निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘येत्या काही दिवसांत होणाऱ्या वाटाघाटींमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इस्रायलच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांची ही सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे इस्रायलला सांगण्यात आले आहे. मात्र, दोन आठवड्यांच्या या युद्धविरामात लेबनानचा समावेश असणार नाही, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

याआधी शाहबाज शरीफ यांनी अमेरिका, इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी मान्य केलेला हा युद्धविराम लेबनानसह ‘सगळीकडे’ लागू असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच नेतान्याहू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा खोडून काढले. यावरून इस्रायलच्या लेबनान विरोधात कारवाया सुरूच राहतील असे स्पष्ट होत आहे.

नेतन्याहू यांच्या कार्यालयाने आपल्या X पोस्टमधून पुढील माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘इराणने तात्काळ सामुद्रधुनी खुली करण्याच्या आणि अमेरिका, इस्रायल व या प्रदेशातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवण्याच्या अटीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे. इराणकडून अमेरिका, इस्रायल, इराणचे अरब शेजारी देश आणि जगाला असलेला अण्वस्त्र, क्षेपणास्त्र आणि दहशतवादी धोका संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांनाही इस्रायलचा पाठिंबा आहे. येत्या काळात होणाऱ्या वाटाघाटींमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इस्रायलच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांची ही सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे अमेरिकेने इस्रायलला कळवले आहे. या दोन आठवड्यांच्या युद्धविरामात लेबनानचा समावेश नाही.’

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘हिजबुल्ला’ने इस्रायली शहरांवर रॉकेट डागले होते. त्यानंतर इस्रायलने लेबनानवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले, ज्यामध्ये १,५०० हून अधिक लोक मारले गेले आणि १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

Comments are closed.