अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचा मलेशियावर 315 धावांनी ऐतिहासिक विजय! अभिज्ञान कुंडूचे तुफानी द्विशतक
दुबईत सुरू असलेल्या अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाची शानदार कामगिरी सुरूच आहे. मंगळवारी (16 डिसेंबर) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा 315 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकाच्या जोरावर 408 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात मलेशियाचा संघ 32.1 षटकात केवळ 93 धावांवर गारद झाला.
या विजयासोबतच भारताने स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक तर साधलीच, पण अंडर-19 क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. धावांच्या बाबतीत अंडर-19 आशिया कपच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
दुबईच्या सेवन्स स्टेडियमवर मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सुरुवात खराब झाली; कर्णधार आयुष म्हात्रे (14) आणि विहान मल्होत्रा (7) स्वस्तात बाद झाले. वैभव सूर्यवंशीने अर्धशतक झळकावले, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. 87 धावांवर 3 विकेट्स गमावल्यानंतर भारत अडचणीत होता. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या अभिज्ञान कुंडूने वेदांत त्रिवेदीसोबत मिळून डाव सावरला. कुंडूने अवघ्या 125 चेंडूत 209 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 17 चौके आणि 9 षटकार ठोकले. त्याच्या या द्विशतकामुळे भारताने 50 षटकात 7 बाद 408 धावा केल्या. वेदांत त्रिवेदीनेही 90 धावांचे मोलाचे योगदान दिले.
409 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर शून्य धावांवर बाद झाले. भारतीय गोलंदाजांच्या दबावापुढे मलेशियाचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि अवघ्या 30 धावांत निम्मा संघ बाद झाला. अखेर पूर्ण संघ 93 धावांत आटोपला. मलेशियाच्या 6 फलंदाजांना तर दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रनने भेदक मारा करत 5 बळी घेतले. त्याने 7 षटकात केवळ 22 धावा देऊन ही कामगिरी केली. दीपेशशिवाय उद्धव मोहनने 2, तर किशन कुमार सिंह, खिलान पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Comments are closed.