U19 WC 2026: टीम इंडियाने झिम्बाब्वेला लोळवलं, 204 धावांनी पराभूत करून मिळवला बलाढ्य विजय
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज मंगळवारी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मधील सुपर 6 फेरीतील सामना खेळवण्यात आला. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या लढतीत भारताने दमदार कामगिरी करत झिम्बाब्वेला 204 धावांनी धूळ चारली. भारताने दिलेल्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 37.4 षटकांत 148 धावांवर गारद झाला.
झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार सिम्बाराशे मुडजेंगेरे (3) आणि सलामीवीर ध्रुव पटेल (8) यांच्यासह तब्बल सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. मात्र लीरॉय चिवौलाने एकाकी झुंज देत 77 चेंडूत 62 धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने कियान ब्लिगनॉट (73 चेंडूत 37) याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 69, तर टाटेंडा चिमुगोरो (29 चेंडूत 29) याच्यासह पाचव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. मात्र पॉवरप्लेमध्येच तीन विकेट गमावल्यानंतर झिम्बाब्वेचा डाव सावरू शकला नाही.
भारताकडून गोलंदाजीत कर्णधार आयुष म्हात्रे आणि उद्धव मोहन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. आर. एस. अंबरीशने दोन, तर खिलन पटेल आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
याआधी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 352 धावा उभारल्या. विहान मल्होत्राने शानदार शतकी खेळी साकारली. त्याने 107 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 30 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने तुफानी 52 धावा ठोकत अर्धशतक पूर्ण केले.
विकेटकीपर अभित्रान कुंडू यानेही अर्धशतकी खेळी करत 62 चेंडूत 61 धावा केल्या. कुंडू आणि विहान मल्होत्रा यांनी पाचव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सलामीवीर एरॉन जॉर्जने 23 धावा केल्या. कर्णधार आयुष म्हात्रे आणि आर. एस. अंबरीश यांनी प्रत्येकी 21 धावांचे योगदान दिले, तर वेदांत त्रिवेदीने 15 धावा जोडल्या.
शेवटच्या षटकांत खिलन पटेलने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 12 चेंडूत 30 धावा केल्या. यात एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कनिष्क चौहानने तीन धावा केल्या.
या दणदणीत विजयासह भारतीय संघाने सुपर 6 फेरीत आपली स्थिती मजबूत केली आहे. भारताचा पुढील सामना 1 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
Comments are closed.