हिंदुस्थानी महिलांची ऐतिहासिक कामगिरी, बांगलादेशचा वचपा काढत आशियाई चषकावर कोरले नाव

मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या U19 Women’s Asia Cup 2024 वर टीम इंडियाने नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात बांगलादेशचा 41 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने विजयाचा जल्लोष साजरा केला. विशेष बाब म्हणजेच पहिल्यांदाच आजोयित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावत टीम इंडियाने इतिहास रचला आहे.

क्वालांलंपूरच्या बाय्युमास ओव्हल येथे टीम इंडिया आणि बांगलादेश या संघांमध्ये अंतिम सामन्याचा थरार पार पडला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून सलामीला आलेल्या त्रिशाने ताबडतोब फलंदाजी करत 47 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा चोपून काढल्या. परंतु तिला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. एका बाजूने त्रिशा खिंड लढवत होती. परंतु दसरीकडे एका मागे एक विकेट पडत होत्या. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार निकी प्रसाद (12 धावा), मिथीला (17 धावा) आणि आयुशी शुक्ला (10 धावा) यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच फलंदाजांना दुहेरी आकडा घाटता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला 20 षटकांमध्ये 7 विकेट गमावत 117 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून फर्जाना इस्मीन हिने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच निशिता अख्तर निशी हिने 2 आणि हबिबा इस्लाम हिने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाने दिलेल्या 118 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला टीम इंडियाच्या गोलदाजांनी मैदानावर टिकू दिले नाही. सलामीला आलेल्या फाहोमिदा चोया (18 धावा) आणि जुएरिया फिरदौस (22 धावा) या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर फलंदाज सलामी लावून माघारी परतले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ फक्त 76 धावांवर बाद झाला आणि टीम इंडियाने 41 धावांनी विजयाचा गुलाल उधळला. टीम इंडियाकडून आयुशी शुक्ला हीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. सोनम यादव व परुणिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तसेच जोशिताने 1 विकेट घेतली. अंतिम सामन्यात जी. त्रिशाने ताबडतोब फलंदाजी करत 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच संपूर्ण स्पर्धेत जी. त्रिशाचा खेळ कौतुकास्पद राहिला त्यामुळेच तिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही सन्मानित करण्यात आले.

Comments are closed.