U19 Women’s T20 World Cup – हिंदुस्थानच्या पोरी जगात भारी, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा; सलग दुसऱ्यांदा उंचावला विश्वचषक
मलेशियातील क्वालालंपूरमध्ये पार पडलेल्या 19 वर्षांखालील युवतींच्या टी20 विश्वचषकामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाचे वर्चस्व पहायला मिळाले. एकही सामना न गमावता अगदी थाटात टीम इंडियाने विश्वचषकाला गवसणी घातली आहे.
क्वालालंपूरच्या बायुमास ओव्हल येथे पार पडलेल्या या अंतीम लढतीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सपशेल अपयशसी ठरवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हजेरी लावून तंबुत परतत होते. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाकडून त्रिशाने सर्वाधित 3 विकेट घेतल्या तर परुणिका, आयुषी आणि वैष्णवी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तसेच शबनम शकील हिने एक विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 82 धावसंख्येवर बाद झाला.
अभिनंदन भारत #U19worldcup #Savind pic.twitter.com/oz7kmdkg4e
– आयसीसी (@आयसीसी) 2 फेब्रुवारी, 2025
दक्षिण आफ्रिकेने दिलेले 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेली जी कमालिनी लवकर बाद झाली. परंतु एका बाजून त्रिशाने मोर्चा लावून धरत तुफान फटकेबाजी केली. तिने 33 चेंडूंमध्ये 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा चोपून काढल्या. तसेच सानिका चाळके हिने 22 चेंडूंमध्ये नाबाद 26 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याची किमया साधली आहे.
Comments are closed.