वैभव सूर्यवंशीने अवघ्या इतक्या चेंडूंमध्ये ठोकले वादळी अर्धशतक, पण पुढे घडलं असं काही…

अंडर 19 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-6 फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुरु असलेल्या सामन्यात भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपली आक्रमक शैली दाखवून दिली. मैदानात उतरताच धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या वैभवने अवघ्या काही षटकांत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दडपण आणले. मात्र, नेहमीप्रमाणेच चांगली सुरुवात मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यात तो अपयशी ठरला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक गमावली, पण अपेक्षेप्रमाणे झिम्बाब्वेच्या कर्णधाराने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आयुषचा सलामीला फारसा प्रभाव दिसून न आल्याने या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. सलामीची जबाबदारी वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांच्याकडे सोपवण्यात आली.

दोन्ही सलामीवीरांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. एरॉन जॉर्जने सुरुवातीपासूनच सकारात्मक खेळ करत 16 चेंडूत 23 धावा केल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र, त्याचा डाव फार काळ टिकला नाही. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार आयुष म्हात्रेही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्याने 19 चेंडूत 21 धावा केल्या आणि बाद झाला.

दरम्यान, वैभव सूर्यवंशी एका टोकाला ठाम उभा राहून आक्रमक फलंदाजी करत होता. संघाची धावसंख्या आधी 50 आणि त्यानंतर झपाट्याने 100 च्या पुढे पोहोचली. वैभव सहजतेने मोठ्या खेळीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र होते. मात्र, अर्धशतकानंतर त्याला आपला डाव पुढे नेता आला नाही.

वैभवने केवळ 30 चेंडूत 52 धावांची झंझावाती खेळी केली. या डावात त्याने चार चौकार आणि चार उंच षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 173.33 इतका प्रभावी राहिला. वैभवच्या रूपाने भारताचा तिसरा गडी बाद झाला. या बातमी खेरीस टीम इंडियाने 16.2 षटकात 130-4 धावा केल्या आहेत.

Comments are closed.