'उदयगिरी', 'हिमगीरी' नेव्हीमध्ये प्रेरित

भारताचे सामरिक सामर्थ्य वाढणार, अण्विक क्षमता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय नौदलात ‘उदयगिरी’ आणि ‘हिमगिरी’ या रडारवर न दिसणाऱ्या युद्धनौकांचा समावेश करण्यात आला आहे. या समावेशामुळे भारताच्या सामरिक सामर्थ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते या अत्याधुनिक युद्धनौकांचे जलावतरण करण्यात आले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथील नाविक तळावर हा जलावतरणाचा कार्यक्रम झाला आहे.

या दोन्ही युद्धनौका ‘17 ए क्लास’ या श्रेणीतील असून ही श्रेणी ‘शिवालिक’ श्रेणीच्या पुढची आहे. सागरात बहुउद्देशीय कामगिरी करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या युद्धनौका रडारवर न दिसणाऱ्या असल्याने शत्रूच्या क्षेपणास्त्रांना त्या चकवा देऊ शकतात. त्यांच्यावर अत्याधुनिक शस्त्रसंभार आणि सेन्सर्स स्थापन करण्यात आले आहेत. त्या आधुनिक प्रोपल्शन व्यवस्थेने युक्त आहेत, अशी माहिती त्यांच्यासंबंधात भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे.

दोन स्थानी बांधणी

या दोन्ही युद्धनौकांची रचना दोन भिन्न भिन्न स्थानी करण्यात आली आहे. ‘उदयगिरी’ युद्धनौकेची रचना माझगाव डॉक नौकानिर्मिती केंद्रात महाराष्ट्रातील माझगाव येथे करण्यात आली असून ‘हिमगिरी’ची निर्मिती कोलकाता येथे गार्डनरिच नौकानिर्मिती केंद्रात करण्यात आली आहे. या दोन युद्धनौकांची निर्मिती भारतात बव्हंशी स्वबळावर केली असून भारताच्या वाढत्या नौकानिर्मिती क्षमतेच्या प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे, असेही अनेक तज्ञांचे मत आहे.

हीच नावे कशासाठी…

भारताने आपल्या जुन्या नौकांच्या नावाने नव्या युद्धनौका निर्माण करण्याची एक परंपरा स्थापन केली आहे. तीस दशकांपूर्वी याच नावांच्या दोन युद्धनौका भारतीय नौदलात सेवारत होत्या. त्यांनी तीन दशके भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण केले होते. नंतर त्यांना निवृत्त करण्यात आले होते. त्या युद्धनौकांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांची नावे या नव्या युद्धनौकांना देण्यात आली आहेत.

‘आन्मनिर्भर’च्या मार्गावर

या दोन्ही युद्धनौकांमधील 75 प्रतिशत सुटे भाग भारत निर्मित आहेत. शस्त्रसंभारही बव्हंशी भारत निर्मित आहे. भारताच्या ‘आत्मनिर्भरता’ या नव्या मंत्राला अनुसरुन या नौकांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यांच्या यशस्वी निर्मितीमुळे ‘आत्मनिर्भरता’ कार्यक्रमाला मोठे पाठबळ मिळणार असून भविष्यकाळात आणखी अत्याधुनिक युद्धसाधने स्वबळावर निर्माण केली जाणार आहेत. या युद्धनौकांच्या सुट्या भागांची निर्मिती भारतातील अनेक लघु आणि लघु-मध्यम उद्योग केंद्रांमध्ये झाली आहे. ‘उदयगिरी’ ही युद्धनौका तिच्या श्रेणीतील सर्वात वेगवान युद्धनौका म्हणून परिचित होत आहे.

काय कामगिरी करणार…

या युद्धनौका काही काळातच भारताच्या पूर्व सागर तटावर नियुक्त केल्या जाणार आहेत. सागरपृष्ठावरील युद्ध, शत्रूच्या पाणबुड्यांचा नाश करणे, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रकारात अग्रेसर राहणे आणि भारताच्या सागरी क्षेत्राची देखरेख करणे, शत्रूच्या नौकांवर क्षेपणास्त्र आणि इतर प्रकारचे हल्ले चढविणे इत्यादी विविध कामगिरी पार पाडण्यास या युद्धनौका सक्षम आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

शस्त्रसंभार कोणता…

या युद्धनौकांवर अत्याधुनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रे, भूपृष्ठावरुन भूपृष्ठावर मारा करणारी अग्नी आणि इतर प्रकारांची क्षेपणास्त्रे. पाणबुडीविरोधी टार्पेडो, मशिनगन्स, लहान तोफा, अत्याधुनिक रडार आणि सेन्सर यंत्रणा, असा शस्त्रसंभार आहे. आगामी किमान तीन दशके त्या भारताच्या सागरी संरक्षाचा भार वाहणार आहेत.

‘आत्मनिर्भर’ भारताला बळ

ड ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेला बळ मिळणार

ड या नौकांमधील 75 प्रतिशत भागांची निर्मिती भारताने केली स्वबळावर

ड या दोन्ही युद्धनौकांवर अत्याधुनिक शस्त्रसंभार, सेन्सर्स, प्रोपल्शन यंत्रणा

ड या युद्धनौकांच्या निर्मितीत भारतातील लघु-मध्यम उद्योगांकडून योगदान

Comments are closed.