ठाकरे ब्रँड काय आहे ते आता कळेल! उद्धव ठाकरे यांचा घणाघात… बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही
कागदावरची सत्ता कोणाचीही असो, वट शिवसेनेचीच असते. बाकीचे नुसतेच वटवट करतात. आमची वट असते. बेस्ट कर्मचाऱ्यांनी हे दाखवून दिले आहे. बेस्ट कामगार सेनेचे काय होईल, याची मला चिंता नाही. बेस्टचे काय होईल याची चिंता आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बेस्ट उपक्रमाबद्दल आत्मीयता व्यक्त केली. बेस्टचे खासगीकरण करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या षड्यंत्राविरोधात त्यांनी एल्गार केला. ठाकरे ब्रँड काय आहे ते आता कळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरे ब्रँड सुरू झाल्यानंतर तो कसा वाजतो ते आता विरोधकांना कळेल, असा टोलाही त्यांनी हाणला.
बेस्ट कामगार सेना पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा शिवसेना भवन येथे पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बेस्ट कामगार सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस नितीन नांदगावकर यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. आपले सरकार राहिले असते तर बेस्टला नक्कीच एका वैभवापर्यंत नेऊन ठेवले असते. मेळाव्याला शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते-बेस्ट कामगार सेनेचे मार्गदर्शक गौरीशंकर खोत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बेस्टही अदानीच्या हातात देतील
मला मुंबईच्या मराठी ठशाची चिंता आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘अदानीप्रेमा’चा समाचार घेतला. जिथे जिथे मराठी माणसाचे अस्तित्व आहे त्या संस्था बंद करून टाकायच्या. एकतर विकून टाकायच्या किंवा नष्ट करायच्या. बेस्टही अदानीच्या हातात देतील. विमानतळ, बंदरे, मोनो अंबानीला दिली आहेत. आता बेस्टही अदानीच्या हातात देतील.
बेस्टवर पूर्ण ताकदीने भगवा फडकेल
बेस्ट कामगार सेनेमध्ये हक्काचा माणूस आहे. संघटनात्मक बदल करावे लागतात. नवा हुरूप येतो, नवीन पिढय़ा तयार कराव्या लागतात. मला बेस्टवर पूर्ण ताकदीने भगवा फडकलेला पाहायचाय, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. दुसरे मेजॉरिटी आहे म्हणून मिरवत असतील. माझे शिवसैनिक नक्कीच भगवा फडकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एका पराभवातून मी खचणारा नाहीय? पराभवाचे रूपांतर विजयात करण्याची माझ्यात जिद्द आहे? विरोधक फक्त निष्ठूरपणे सर्व काही बळकावण्याचे काम करताहेत? जे दिसेल, ते माझे… अशा पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे? त्यांना भस्म्यारोग लागला आहे? ही लोकशाही नाही तर चोरशाही आहे. – उद्धव ठाकरे
बेस्ट कामगार सेना मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला?
Comments are closed.