गद्दारांचा बुडबुडा फुटलेला असून मिंधे गटात अक्षरशः मारामारी, उद्धव ठाकरे यांची टीका

ठाण्यातील शिवसेनेतून बाहेर पडून मिंधे गटात सामील झालेले अनेक कार्यकर्ते आता परत येत आहेत येत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. “आजही काही जण तिकडे गेले होते, पण तेही परत आलेले आहेत. थोडक्यात, गद्दारांचा बुडबुडा फुटलेला आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मिंधे गटामध्ये अक्षरशः मारामारी, बाचाबाची सुरू झाली असून आता अनेक जण सत्य स्वरूप लक्षात आल्यामुळे शिवसेनेत परत येत आहेत. “भाजपमध्येही लोक येत आहेत, राष्ट्रवादीतले आलेत आणि रोज कुणीतरी शिवसेनेत प्रवेश करत आहे. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना केंद्र सरकारवरही टीका केली. काही राजकीय ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय हा लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. “राजभवनच लोकभवन करतायत, प्रधानमंत्री कार्यालयाला सेवा केंद्र किंवा सेवा तीर्थ म्हणतायत, पण त्याच्या आडून दुसऱ्याच गोष्टी सुरू आहेत,” असे ते म्हणाले. पेगासिस प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सरकार नागरिकांवर हेरगिरी करत असल्याचा आरोप केला. “पेगासिसचं नाव बदलून संचार साथी केलं आहे. तेच हेरगिरीच करतायत. पण देशात दहशतवादी हल्ले करणाऱ्यांवर लक्ष नाही. दिल्लीचे स्फोट झाले कसे? किती लोक गेले? कोणी केले? पहललगाममध्ये अतिरेकी घुसले कसे? यावर ते न बोलता आपल्याच लोकांवर नजर ठेवतायत,” अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांच्यावरच ते अविश्वास दाखवत आहेत. एवढा कर्मदरिद्रीपणा आजपर्यंत कोणी केला नसेल.” ठाणे, नवी मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याचे सांगत त्यांनी पक्षबदल करणाऱ्यांवर सूचक टीका केली. “तिथे हाणामाऱ्या जोरात चालू आहेत, पैशांचा उधळपट्टी सुरू आहे. हेलिकॉप्टरमध्ये बॅगागांनी सामान नेता, धाड टाकतात तेही आपल्या लोकांवर. ज्यांच्यावर धाड टाकली त्यांना काही नाही, ज्यांनी धाड टाकली त्यांच्यावर गुन्हे. हे सगळं फार घाणेरडे चाललेलं आहे,” अशी कठोर भूमिका त्यांनी मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने स्वतःला देशाचे तारणहार म्हणून उभे केले, हाच एक मोठा घोटाळा आहे आणि त्या घोटाळ्यातून आता अनेक जण जागे होत आहेत. “उरलेल्यांना तुम्ही जागे करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेचा अस्सल भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले. “भगव्यावर कोणतंही चित्र नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल भगवा तोच. मशालीची निशाणीही वेगळी ठेवा, पण खरी शिवसेना त्या भगव्या झेंड्यासह महापालिकेत झेंडा फडकवेल,” असे सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.