सत्ता जाण्याची वेळ आल्यामुळे भाजपसोबत गेलेल्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ, उद्धव ठाकरे यांची टीका

जोपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असले काय नसले काय कुणाला काहीच फरक पडत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी यांनी केला. तसेच सत्ता जाण्याची वेळ आल्यामुळे भाजपसोबत गेलेल्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आज मातोश्री येथे अजित पवार गट आणि मिंधे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, एक नवीन सुरुवात संपूर्ण देशामध्ये होत आहे. कालचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते आपण पाहत आहोत आणि भोगत आहोत. भ्रष्टाचार एवढ्या उघडपणे सुरू आहे की महाराष्ट्रात जणू काही बेबंदशाही सुरू आहे. कुणी कुणाला विचारायला धजावत नाहिये. जोपर्यंत या भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असले काय नसले काय याचा कुणाला काहीच फरक पडत नाही. काल दिल्लीमध्ये जे घडलं ते काही वर्षात देशाच्या इतिसाहात प्रथम खासदारांना अटक करण्यात आली. का अटक करण्यात आली जी मतांची चोरी करून जे लोक सत्तेत बसले आहेत, ती चोरी आपण उघड केली आणि त्याबद्दल जाब विचारायला जात होते त्यांना जाऊ दिले नाही. मग हे कुणाचं सरकार आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला
तसेच दोन तीन वर्षांपूर्वी शेतकरी त्याच्या न्यायहक्कासाठी जात होता, त्यांच्या मार्गामध्ये सगळे खिळे पसरले गेले, मोठ्या बॅरिगेट्स टाकल्या गेल्या. शेतकऱ्यांनी दिल्लीत जायचं नाही. जे खासदार जनतेने निवडून दिले आहेत, त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. आपण जर पुराव्यानिशी त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवर कारवाई करायची नाही. आपण किती दिवस सहन करणार हे? देशातले आणि राज्यातले हे थापा मारून आलेले सरकार. एक एक करून आपल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या निघत आहेत. म्हणून आज शिवसेनेत आलेले आहेत त्यांचे मला कौतुक आहे. कारण सत्तेच्या नादाला लागून भले भले बिघडलेले आहेत. आणि आता त्यांच्यावर कपाळावर हात मारायची वेळ आली आहे कारण सत्ता जाण्याची वेळ आली आहे. भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात तिथे गेले आहेत, ते आता कपाळावर हात मारून बसले आहेत.
आपण लढणारी माणसं आहोत, आपल्याला सत्तेचा मोह किंवा लालूच नाही. आणि या संघर्षासाठी कशाचीही पर्वा न करता तुम्ही सगळे शिवसेनेत आलात, तुमचं मनापासून स्वागत आहे. जनतेच्या न्यायहक्कासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
Comments are closed.