बिहारमध्ये ज्यांच्या सभेला जास्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार, उद्धव ठाकरे यांचा NDA ला टोला

बिहारमध्ये ज्यांच्या सभेला जास्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएला लगवला. तसेच निवडणूक हा लोकशाहीचा जीव आहे. जीवावरच घाला घातला जात आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
आज मातोश्रीत आमदार चषकच्या लोगोचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना बिहार निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले होती की जो जिता वही सिकंदर. पण सिकंदर होण्याचा राज कोई समझ नही सका आजतक. जे जिंकले त्यांचे अभिनंदन आहे. एका गोष्टीचं मला नवल वाटतं की, प्रचारादरम्यान तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद होता तो खरा होता की AI ने तयार केलेली माणसं होती? हे आता कळेनासे झालेले आहे. ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्यांचे सरकार न येता ज्यांच्या सभेला जास्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे लोकशाहीतलं गणित कळण्यापलीकडे आहे.
तसेच महिलांना 10 हजार रुपये देण्यात आले हा एक मोठा फॅक्टर ठरला. पण त्याहीपेक्षा जास्त फरक पडला असावा. पण दररोज तिथल्या जनतेला जो त्रास होत आहे त्यांचं मन बदललं नसेल. बिहारमध्ये अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेरहा पुढे आलेला नाही. हेच त्यांच्या बहुमताचं गणित आहे. आपल्या महाराष्ट्रातही पाशवी बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडायला एक महिना लागला होता. तसंच तिकडे बिहारमध्ये करायला निघाले आहे. एवढं काही असताना, तुम्हाला बहुमत असताना नेता निवडायला एवढा वेळ का लागतोय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
अनाकलनीय गणित झालेलं आहे. मतदार यादीतून 65 लाख नावं गाळली गेली होती. ती नावं घेतली होती की नाही हे काहीच कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रातसुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला होता आणि दुबार मतदान नोंदणी झालेली आहे. अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत. त्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही. निवडणूक आयोग ढिम्म बसलेला आहे आणि अशा वेळी याला लोकशाही मानायचं का? आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक हा लोकशाहीचा जीव आहे. पण त्या जीवावरच अशा प्रकारे घाला घातला जात असेल, त्यातली पारदर्शकता जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का?
भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेले आहेत. भाजपला राष्ट्रीय गीत शिकवण्याची गरज आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हे त्यात दिलं आहे. या प्रत्येकाचं त्यात वैशिष्ट्य आहे. आणि ही प्रादेशिक अस्मिता मारायचा जो कोणी प्रयत्न करत असेल तो पक्ष या देशात संपल्या शिवाय राहणार नाही. पण हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. आपल्या देशात अनेकता मध्ये एकता आहे. ही अनेकता मारायला कुणी आलं तर त्या मारणाऱ्यालाच सगळे जण एकत्र येऊन राजकारणात त्याला मारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Comments are closed.