कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आज हिंदुस्थानच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार स्वागत शिवसेनेच्या (उद्धव बाळसाहेब ठाकरे) वतीने करण्यात आले. शिवसेना भवनाच्या प्रांगणात आज मध्यरात्री १२ वाजता भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते.
देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज १५ ऑगस्ट, आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन. या स्वातंत्र्यदिनाच्या, आपल्यासह संपूर्ण देशवासीयांना मी शिवसेनेतर्फे शुभेच्छा देत आहे. दरवर्षी आपण १५ ऑगस्ट रोजी सकाळी झेंडावंदन करतो, राष्ट्रध्वज फडकावतो, मग आज मध्यरात्री का? याचे कारण असं की, सध्या दिवस तर वैऱ्यांचे आहेतच, मात्र आता रात्रसुद्धा वैऱ्याची आहे. रात्रीसुद्धा जागत राहून आपल्यालाच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे, हे सांगण्यासाठी आपण मध्यरात्री येथे जमलो आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “मला खात्री आहे, ज्या एका जल्लोषात, ज्या एका उत्साहात आपण सर्वजण तिरंग्याला वंदन करायला आला आहात आणि आपला स्वातंत्र्यदिन साजरा करायला आले आहात, कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही. याचे कारण, स्वकीय असो किंवा परकीय असो, आम्ही कोणाचेही गुलाम होणार नाही, हा संदेश ज्यांना द्यायचा आहे, त्यांना आपण देत आहोत. मला खात्री आहे की, आता देशाला जी जाग आली आहे, ती बघितल्यानंतर आपल्या स्वातंत्र्याला, आपल्या संविधानाला धक्का लावण्याचा कोणीही प्रयत्न किंवा हिंमत करणार नाही.”
Comments are closed.