मंदिर लुटीचा विषय धसास लागत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले; अयोध्या आणि काशी विश्वनाथ यांच्या दर्शनाला जाऊन महाआरती करणार

मंदिर लुटीचा विषय जोपर्यंत धसास लागत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसेच मुंबईत, नागपूरमध्ये महाआरती केली. मी तर राज्यात सगळीकडे जणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ यांच्या सुद्धा दर्शनाला जाऊन महाआरती करेन, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. आयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी विरोधात शिवसेनेने आज नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात भाजपवर घणाघात केला.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो… आज पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत. आपण सर्वजण साक्ष आहात, काही वर्षापूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी मंदिर निर्माणाच्या लढ्याला एक तेज प्राप्त करून दिलं होतं. आज मला नाही म्हटलं तरी वाईट वाटतंय की मंदिर उभं जरूर राहिलं पण नवा लढा मंदिराच्या रक्षणा करता आपल्याला सुरू करावा लागतोय. या मंदिराच्या सर्व गुरुजींना धन्यवाद देतो, त्यांनी मनापासून सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच नाही तर आशीर्वाद सुद्धा दिलेत. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? म्हटलं का? नाही कारण, मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की, फडणवीसजी रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताहेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली बातमी दिल्लीतून आली. गेली २० दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली? जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले. चादरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले. दीपके यालाही मारहाण केली. त्याच्या अंगावर शाई फेकली. आणि ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हे विचारलं की, श्रीरामा हे काय झालंय? ज्या भाजपने तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? माणुसकी गेली बाजूला यांच्यातला सैतान कसा काय जागा झाला? एवढे कसे हे सत्ता पिपासू झाले. आणि मोहनजी भागवत यांना विचारायचं आहे, कारण हे नागपूर आहे की, भागवतसाहेब ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जाताहेत. विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागताहेत हे तुम्ही बघितलंय. पेपरफुटताहेत, पक्ष तर फोडले जाताहेत पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जाताहेत, हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? आमचं हिंदुराष्ट्र हे नव्हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये रामराज्य अपेक्षित आहे, शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरीबांना महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देणारं हे खरं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कॉन्ट्रॅक्टरना अभय देणारं हिंदूराष्ट्र आमचं असून शकत नाही. म्हणून भागतसाहेब तुम्ही फेब्रुवारीत बोलला होतात की, या देशातले मुस्लिम सुद्धा हिंदूच आहेत. आणि हिंदुंनी दोन ते तीन आपत्य जन्माला घालायला पाहिजेत. ही आपत्य जन्माला घातलीत आणि परीक्षेतले पेपर फुटलेत, अनेकांनी आत्महत्या केल्यात त्यांचं पहिले काय करणार? आणखीन आपत्य जन्माला घालून पुन्हा तुम्ही त्यांना तसेच चिरडणार आहात? हे हिंदू राष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नाही. अजिबात नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.

ज्या वेळेला बाबरीचा लढा झाला, बाबरीचं पतन झालं, बाबरी पाडली गेली. हे आज सत्तेवर बसलेत त्यापैकी एकही कोणी छाती पुढे काढून आला नव्हता. तेव्हा फक्त एकमेव हिंदुहृदयस्रमाट उभे राहिले होते. कारण भाजपवालेच तेव्हा म्हणत होते, हे आमचं काम नाही असेल तर शिवसैनिकांचं काम असेल. मी स्वतः तेव्हा बाळासाहेबांच्या बाजूला उभा होतो. तेव्हा संजय राऊत यांनी बाळासाहेबांना फोन केला होता. आणि बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला. अनेकांनी बलिदान केलं. अनेकजण त्यावेळेला झालेल्या पोलीस अत्याचारामध्ये कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी जो धोका डोक्यावर घेतला होता, अनेकजणांनी जे बलिदान केलं हे यांच्या चोरांच्या पोटापाण्यासाठी नव्हतं केलं. मंदिर वही बनायेंगे, कशाला बनाने के बाद लुटने के लिये? आम्ही आहोत ते मंदिर लुटारुंच्या विरुद्ध आहोत. फडणवीसांनी आमची चेष्टा, टिंगल, मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की रामरक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहा ते पहिले स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे रामरक्षा पाठ आहे की नाही हे बघण्याचं आंदोल नाही. हे एखाद्या वर्गाच्या मॉनिटरसारखं बोलू नका, रामरक्षा पाठ आहे की नाही? रामरक्षा म्हणजे आज जे आपण जे आपण नेहमी म्हणतो की रामाने आपली रक्षा केली पाहिजे आज रामभक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ रामाच्या नावाने मतं मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारामध्ये आपल्याला करावी लागतेय. याच्या सारखं हिंदूंचं दुर्दैवं कोणतं? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कोणतं असं क्षेत्र आहे की, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये? केदारनाथ, बद्रिनाथच्या मंदिरात चोरी झालेली आहे. उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे. अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे. अयोध्येत सुद्धा मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी घेतल्या आणि शतपटीने किमती वाढवून ट्रस्टला विकल्या गेलेल्या आहेत, हे मी नाही सगळे म्हणताहेत. अनेकजण साधू आहेत राग, संताप व्यक्त करत आहेत. एका साधूने सांगितलं तर हे मंदिर नाहीये हे तर म्हणे भाजपचं पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे. एटीम. आणि आणखी काहीजण म्हणाले की, तिथे तिजोरीवरती जो काही डल्ला मारला गेला त्यातून आमदार, खासदार विकत घेतले गेले. आज त्या गद्दारांना सुद्धा विचारायचं आहे. माझ्यावरती आरोप करत होतात बाळासाहेबांचे विचार सोडले? अरे मी बाळासाहेबांचे विचार घेऊन आज सुद्धा ठामपणे उभा आहे. मंदिर चोरांना आम्ही जाब विचारायला उभे आहोत, तुमच्यामध्ये जर हिंमत राहिली असेल तर तुम्ही भाजपला प्रश्न विचारून दाखवा? त्यांच्या घरचे पाणके होऊ नका. गद्दारांच्या अंगात हिंदुत्वाचं रक्त असेल तर त्यांनी मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. का नाही करत? कारण यांच्यात दम राहिलेला नाही, लाचार होणारा हा कधी हिंदू नाहीये. मी घातलेला भगा झब्बा आणि हातात भगवा झेंडा हा काही गंमत म्हणून घेतलेला नाही. आमच्या अंगामध्ये जे हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी भिनवलं आहे त्याचं हे प्रतिक म्हणून आम्ही भगव्या टोप्या, भगवा झब्बा आणि भगवे झेंडा घेऊन फिरतो आहोत. ही काही नाटक कंपनी काढलेली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली. आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं. तेव्हा हेच काहूर करत होते, हिंदुत्व सोडलं… हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही पण आज मला भाजपला विचारायचं आहे तुम्ही का हिंदुत्व सोडलत? तुम्ही का बोलत नाहीत? आणि माझी तर ठाम मागणी आहे. यांनी स्थापन केलेली एसआयटी हे थोतांड आहे, ही नाटकं आहेत. एक एक विषय निर्माण झाले की, दुसरा विषय काढायचा की पहिला विषय लोक विसरून जातात. आणि मग त्याचच भांडवलं करायचं. त्यांना माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दिर्घकालीन नसते. पण मंदिर लुटीचा विषय जोपर्यंत धसास लागत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. मुंबईमध्ये केली, नागपूरमध्ये महाआरती केली. मी तर राज्यात सगळीकडे जणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ यांच्या सुद्धा दर्शनाला जाऊन मी महाआरती करेन, अशी घोषणा करत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा जाहीर केला.

सविस्तर वृत्त लवकरच…

Comments are closed.