हेवेदावे सोडून शेतकर्‍यांना मदत करा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यातील शेतकरी संकटात असताना ‘मी काय केले, तुम्ही काय केले’ हे बघण्याची वेळ नाही. सर्व हेवेदावे सोडून अगोदग माझ्या शेतकर्‍याला भरीव मदत करा, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजारांचा मदत मिळाली पाहिजे, होय मी आरशात पाहतो, तुम्ही शेतकर्‍यांकडे पहा, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.

अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १० रोजी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी स्वत: आरशात बघावे, अशी टीका केली होती. कर्जमाफीचा शेतकर्‍यांना नाद लागला असल्याचे संवेदनशील वक्तव्य सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. नाद कशाशी संबंधित असतो हे त्यांना ठाऊक असले पाहिजे. त्यांची मानसिक स्थिती तपासण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले. असे लोक लोकांचे काय भले करणार, असा प्रश्नही त्यांनी केला. आज काढलेला हंबरडा मोर्चा नसून, इशारा मोर्चा आहे. त्यानंतरही शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारला ऐकू गेला नाही तर राज ठाकरे आणि मी सोबत येऊ, असे ते म्हणाले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी होते, याची तपासणी करण्यासाठी शिवसैनिकांचे गावागावात दक्षता पथक नियुक्त केले जाणार आहे. हे पथक तपासणी करेल. मनरेगामधून हेक्टरी साडेतीन लाख मुख्यमंत्री कसे देणार, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

Comments are closed.