सरकारचा बैल बशा निघाला! आता या गद्दार नालायक खासदारांना जुंपा!! उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला
शिर्डीतील खासदाराविरोधात जनतेमध्ये खदखदत असलेला संताप आज उफाळून आला. शिर्डीत झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला निष्ठावंत शिवसैनिकांची आणि शिर्डीकरांची तुफान गर्दी उसळली. या गर्दीच्या साक्षीनेच गद्दार खासदार आणि सरकारविरोधात उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. ‘सरकार फोडाफोडीत मश्गुल आहे. पेपर फुटीने हैराण झालेल्या तरुणांकडे आणि कर्जबाजारी शेतकऱयांकडे पाहायलाही सरकारला वेळ नाही. शेत नांगरायला शेतकऱयांकडे बैलही नाही. एका शेतकऱयाला सरकारने दिलेला बैलही बशा निघाला. आता या गद्दार नालायक खासदारांनाच औताला जुंपा,’ अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.
शिवसेनेशी बेइमानी करून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर गद्दारांना मतदान करणाऱया मतदारांशी व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱयावर आहेत. यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी आणि धाराशीवनंतर आज शिर्डीत त्यांची भरगच्च सभा झाली. यावेळी त्यांनी खासदार वाकचौरे यांची अक्षरशः चंपी केली.
गद्दारीचे समर्थन करताना विकास निधीचे कारण देणाऱया वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी झोडपून काढले. ‘या खाऊसाहेबांना 15 कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला होता. त्यातले फक्त 70 लाख खर्च केले. 135 कामांपैकी फक्त दोन कामं झाली. मग विकास निधीचा प्रश्न येतो कुठे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. विकास निधीच्या गप्पा शिर्डीत सांगू नका. गरीबाच्या घरात तेल नसताना साईबाबांनी पाण्याने दिवा पेटवला. ही शक्ती आपण साईबाबांकडून घेतली पाहिजे. अरे, असेल समोर सत्ता, असेल पैसा; पण जे काम करतो त्यावर श्रद्धा असली पाहिजे. त्या श्रद्धेचं फळ मिळण्याइतकी सबुरी असली पाहिजे. साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धा आणि सबुरीला महत्त्व आहे. कुठेतरी श्रद्धा असावी लागते. आपली श्रद्धा आपल्या कामावर व भगव्यावर आहे, पण यांची कुणावरच श्रद्धा नाही. यांचा रोज नवीन बाप असतो आणि सबुरीचा तर पत्ताच नाही. त्यावेळी थांबला असता तर केंद्रात आपलं सरकार आलं होतं. उद्या येणारं सरकारही आपलं आहे, पण हा आताही थांबला नाही. पण, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. अशा भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्यासोबत राहता कामा नयेत म्हणून देवानेच त्यांना दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी दिली असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘हा खासदार पुन्हा हरवला आहे, सापडला तर सोडू नका आणि अजिबात परत आणूही नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
निष्ठावंत खासदारांचे कौतुक
उद्धव ठाकरे यांनी यावेळी निष्ठावंत खासदारांचे कौतुक केले. संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनाही मंत्रिपदाच्या ऑफर आल्या होत्या. राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाशभाऊंनी सांगितले की आम्ही घरी बसू; पण मतदारांशी गद्दारी करणार नाही. याला म्हणतात निष्ठा. याला म्हणतात श्रद्धा आणि सबुरी. शिवसेनेचे 40 आमदार फोडले तेव्हा शिवसेना संपली असे काही जण म्हणत होते. तरी आपण त्यांच्या उरावर 9 खासदार निवडून आणून बसवले. आता त्यातले 6 फोडले. पण त्याने फरक पडणार नाही. शिवसेनेचा राग काय असतो हे आता दाखवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
महिलांच्या आरक्षणावर बोलतात, अत्याचारावर बोलत नाहीत!
अलीकडे केंद्र सरकारने एक विधेयक आणलं होतं. त्याला महिला आरक्षणाचा मुलामा दिला होता. दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असूनही हे सुरू आहेत, पण त्यावर कोणी काही बोलत नाही. खुर्ची जाणार हे कळल्यापासून ते हतबल झालेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. महिला आरक्षणावर बोलणारे महिला अत्याचारावर मात्र बोलत नाहीत, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
मराठी माणसांमध्ये भांडणे लावण्यासाठी ‘सुपारीसेना’
मराठी माणसांमध्ये भांडण लावण्यासाठी ‘सुपारीसेना’ काढल्या आहेत. आपलेच लोक फोडून आपल्यावरच सोडतात. आपण भांडत बसणार आणि हे लोक राज्य करत बसणार. यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी मला इथला खासदार हवा आहे. देशाचा पंतप्रधान कोणीही झाला तरी त्याच्यासमोर छातीठोकपणे महाराष्ट्राचे प्रश्न मांडणारा इथला खासदार हवा आहे. म्हणूनच मुख्यमंत्रीही मला शिवसेनेचाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार राजाभाऊ वाजे, विनायक राऊत, आमदार तथा संपर्क नेते सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख रावजी नांगरे उपस्थित होते.
म्हणून यांना ठाकरे नकोत!
‘ठाकरे संपले तर महाराष्ट्रातून प्रश्न विचारणारा दुसरा कुणी राहणार नाही म्हणून यांना ठाकरे संपवायचे आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्राच्या मनामनात बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत. उद्धव ठाकरे ही व्यक्ती आहे, पण बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. तो विचार स्वाभिमानाच्या रूपाने हिंदू आणि मराठी माणसांच्या विचारांत भिनला आहे. अशा कितीही शहासेना आल्या तरी तो उखडला जाऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
शहासेनेच्या प्रमुखाला फडणवीसांची सुपारी
‘राज्यावरचे आणि देशावरचे संकट आणि अरिष्ट लवकर दूर कर, ही भ्रष्ट राजवट तोडून गाडून टाक’, अशी मी आज साईचरणी प्रार्थना केली. देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचे रक्षण कर अशीही प्रार्थना केली. कारण त्यांचा पत्ता कापला जाणार आहे. कुणाचं वाईट व्हावं आणि आपलं भलं व्हावं ही दुर्बुद्धी मला कधी सुचली नाही आणि ती सुचू नये, अशी प्रार्थनाही केली. पण प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. त्यामुळे 2029 नंतर कोण आणि आपल्याला वाली कोण, अशी चर्चा दिल्लीतील भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आशेचे अंकुर फुटायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस या शर्यतीत येऊ शकतात असे वाटल्यामुळे त्यांना दिल्लीपासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहासेनेच्या प्रमुखाला फडणवीसांना इथल्या इथे गुंतवण्याची सुपारी देण्यात आली आहे,’ असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. 2019 साली शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, तर भाजपचे 21 आले होते. युती तुटल्यानंतर आपले 9, भाजपचे 9 आणि शहासेनेचे 6 खासदार निवडून आले. मग शहासेनेने शिवसेनेचे खासदार फोडून आपल्या पक्षात घेतले. म्हणजे महाराष्ट्रात आज भाजपपेक्षा शहासेनेची ताकद वाआता उद्या पंतप्रधानपदाला मतदान करण्याची वेळ येईल तेव्हा शहासेना कुणाला मतदान करणार? हिशोब सरळ आहे, अशी शहासेनेची चाल आहे.
पेपर नव्हे, विद्यार्थ्यांचे नशीब फुटतेय
लागोपाठच्या पेपरफुटीवर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘फक्त पेपर फुटत नाहीत तर विद्यार्थ्यांचे नशीब फुटत आहे. पण सरकारला याचे काहीही पडलेले नाही. प्रत्येक प्रश्नावर हे एकच नारा देतात. ‘नीट’चा पेपर फुटला… जय श्रीराम, टीईटीचा पेपर फुटला… जय श्रीराम, दुष्काळ पडला… जय श्रीराम, शेतमालाला हमीभाव नाही… जय श्रीराम. हे नकली हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व असे नाही. आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम, शेतमालाला दाम हे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हा तर खाऊसाहेब…
‘विश्वास कोणावर ठेवायचा अशी सध्या परिस्थिती आहे. काहींच्या नसानसांत आणि रक्तात गद्दारी भरलेली असते. खाऊसाहेब वाकचौरे हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हा खाऊसाहेब आहे. जाऊ तिथे खाऊ. साईबाबांचे दर्शन घ्यायला गेले तरी यांचे लक्ष नैवेद्याकडे असते,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘खाऊसाहेब गेला हा शुभशकून असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. हे जिथे जातात तिथे बट्टय़ाबोळ होतो. काँग्रेसमध्ये गेले त्यांचं सरकार पडलं. आता शहासेनेत गेलेत, त्यांचंही सरकार पडणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
विश्वासघाताचा हिशेब जनता चुकता करेल, संजय राऊत यांनी डागली तोफ
ज्यांना शिवसेनेने ओळख दिली, शिवसैनिकांनी खांद्यावर घेऊन मोठे केले, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. हा केवळ पक्षांतराचा विषय नसून लाखो शिवसैनिकांच्या भावनांशी केलेला विश्वासघात आहे. जनता या विश्वासघाताचा हिशेब चुकता करेल,’ असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.
‘इकडचा खासदार हा एक नंबरचा बदमाश माणूस होता. त्याने एकदा गद्दारी केली तेव्हा शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला. तो परत आला. उद्धव ठाकरे यांची, शिर्डीकरांची माफी मागितली आणि पुन्हा शंभर कोटीला विकला गेला, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. ‘तीन वेळा साईबाबांची शपथ घेऊन हा म्हणाला होता की मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन. मग आता कुठे मरायला गेला? एक रुपयाही खर्च न करता हा खासदार झाला. खर्च पक्षाचा, कष्ट शिवसैनिकांनी केले. उद्धव ठाकरे यांना मानणाऱया मतदारांनी याला मतं दिली. एक रुपया खर्च न करता याने शंभर कोटी मिळवले. हा धंदा त्याने केला. याची किंमत त्याला मोजावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, आमदार सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
Comments are closed.