महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिचलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱयांशी आज थेट संवाद साधला. पूरग्रस्त शेतकऱयांना ऐतिहासिक पॅकेज दिल्याचे सरकार सांगते, पण शेतकऱयांच्या खात्यात ती मदत अद्याप पोहोचलेलीच नाही. मतचोरी करून आलेल्या सरकारने शेतकऱयांना इतिहासातला सगळय़ात मोठा दगा दिला आहे, महाराष्ट्रात दगाबाज सरकार आहे, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार दगाबाज असेल तर त्याला दगाबाजीनेच मारले पाहिजे. दगाबाजासोबत दगाबाजीच केली पाहिजे. दगाबाजी केल्याशिवाय चालणार नाही. सरकारचे दात घशात घाला, असे आवाहनही त्यांनी केले. जूनपर्यंतची मुदत मान्य नसून शेतकऱयांना तातडीने कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पॅकेज जाहीर करूनही शेतकऱयांची झालेली फसवणूक आणि महायुती सरकारच्या फसव्या योजना यांचा पर्दाफाश करणारा हा दौरा ‘दगाबाज रे’ या शीर्षकाखाली होत आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्हे, बावीस तालुक्यातील आठशेहून अधिक शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. आज पहिल्या दिवशी पैठणमधील नांदर, बीडमधील पाली, धाराशीवमधील पाथ्रुड, परंडा तालुक्यातील शिरसाव आणि सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील घारी गावात शेतकऱयांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी आपल्या व्यथा मांडताना शेतकऱयांना अश्रू अनावर झाले.
शेतकऱयांचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचा अभाव आणि कर्जमाफीच्या घोषणा केवळ थोतांड आहे अशी तोफ डागत उद्धव ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला. सरकारकडे कर्जमुक्तीसाठी संपूर्ण यंत्रणा असतानाही जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, दोन किंवी तीन रुपयांचा पीक विमा देऊन शेतकऱयांची थट्टा सुरू आहे, असा संताप व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेचा भडिमार केला. ते म्हणाले की, आता कर्जमुक्ती केली तर बँकांना फायदा होईल असा अजब शोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे, पुढच्या वर्षीच्या जूनचा मुहूर्त त्यांनी काढला आहे, मग जूनमध्ये कर्जमुक्ती केली तर बँकांना फायदा कसा होणार नाही हे जरा समजावून सांगा, जूनपर्यंतचे हप्ते भरायचे की नाहीत? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. जूनची मुदत शिवसेनेला मान्य नाही, शेतकऱ्यांनी तातडीने कर्जमुक्ती द्या, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
हलवतय सरकार?
निवडणुकीत जिंकायचे होते म्हणून कर्जमाफीचे आश्वासन दिले असे वक्तव्य उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्याचा खरपूस समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्ही अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगताय. हातपाय हलवूनही त्यांच्यावर संकट ओढवले आहे. आपत्तीच इतकी मोठी आली आहे की, हलवले जाणारे हात आता कपाळावर मारायची वेळ आली आहे. त्या शेतकऱयाला तुम्ही हातपाय हलवायला सांगताय? मग तुम्ही काय करताय? तुम्ही सरकार हलवताय का? असे उद्धव ठाकरे अजित पवार यांना उद्देशून म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रापेक्षा बिहारवर जास्त प्रेम
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरसंधान केले. ते म्हणाले की, ‘राज्यातील महायुती सरकार सर्वांशीच दगाफटका करतेय. आनंदाचा शिधा बंद. शिवभोजन थाळी बंद. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱयांना बोलले होते, दिवाळीआधी मदत करणार. पण आता मुख्यमंत्री कुठे? तर बिहारमध्ये. मुख्यमंत्री तिथल्या जाहीर सभेत सांगतात की, पंतप्रधान मोदींचे सगळय़ा राज्यांवरती प्रेम आहे. पण आतली गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींचे बिहारवर जास्त प्रेम आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप घराघरात भांडणे लावतेय
हिंदूंनी दोनपेक्षा जास्त अपत्ये जन्माला घालावी असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. दुसरीकडे राज्य सरकार एका घरात फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असे सांगून महिलांना योजनेतून वगळत आहे. असे करून घराघरात भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. एका घरात दोन बहिणी असतील, सासू असेल, सुना असतील, चार बहिणी असतील मग कुणाला लाडकी बहीणचे पैसे देणार? ज्यांना लाभ मिळतोय ती लाडकी आणि मिळत नाही ती नावडती? असे राज्यकर्ते असू शकत नाहीत. सगळय़ांना समान वागणूक देणे हे सरकारचे काम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या दौऱयावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, परशुराम जाधव, सुनील काटमोरे आदी होते.
एक अनर्थमंत्री आणि एक नगरभकास मंत्री!
राज्यात सध्या एक मुख्यमंत्री आणि दुसरे जे दोघे आहेत त्यातील एक ‘अनर्थमंत्री’ आणि दुसरे एक जे दाढी खाजवत फिरतात ते ‘नगरभकास’ मंत्री असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारच्या नांगरणीसह प्लूल
निवडणूक आलीय, आता मुख्यमंत्री हिंदू-मुस्लिम करायला लागलेत. यांच्या थापेबाजीला आता फसू नका, आता फसलात तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. सरकारची ही दगाबाजी वृत्ती तुमच्या एकजुटीच्या नांगराने नांगरून टाका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्जमुक्ती नाही तर मत नाही
जोपर्यंत कर्जमुक्ती, पीक विमा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत सरकारला मतदान करू नका, दाराबाहेर उभे करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. “कर्जमुक्ती नाही तर मत नाही’’ असे फलक गावोगावी लावा, असेही ते म्हणाले. महायुती सरकार हे दगाबाजीतून आणि मतचोरीतून सत्तेवर आलेले सरकार आहे असे टीकास्त्र त्यांनी सोडले. शेतकरी एकदा पेटून उठला तर सिंहासन जाळून खाक करेल, असा इशारा देतानाच, शिवसेना सदैव शेतकऱयांसोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
खेकड्यांच्या पॅकेजला भोक पडले?
32 हजार कोटींचे पॅकेज ही सरकारने मारलेली ऐतिहासिक थाप आहे. ‘खेकडय़ाने पॅकेजला भोक पाडले की काय?’ असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत मिळाले नाही, तर विमा पंपन्यांच्या कार्यालयात घुसू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्याला हुंदका अनावर
उळूप येथे एका शेतात शेतकरी पेरणी करत असताना पाहून उद्धव ठाकरे हे गाडीतून उतरून थेट शेतात गेले. त्यांना पाहताच संदिपान वरळे या शेतकऱयाला हुंदका अनावर झाला. सरकारने पॅकेज जाहीर केले, पण रुपयाही मिळाला नाही… असे सांगताना वरळे यांचा गळा दाटून आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, ‘तुम्ही धीर सोडू नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे’ असा धीर दिला.
शिवसेनेमुळे आमची दिवाळी साजरी झाली
धाराशीव जिल्हय़ातील पाथ्रुड येथे शेतकरी अनिल भोरे यांनी शेतकऱयांच्या मदतीवरून फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले होते, परंतु खडकूही मिळाला नाही. शिवसेनेने मदत केल्यामुळे आमची दिवाळी साजरी झाली, असे ते म्हणाले. या भागात दूध उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर होते. परंतु भेसळयुक्त दुधामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भावच मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Comments are closed.