पैशाचा महापूर तरीही निष्ठेची भिंत अभेद्य! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेच्या विजयी शिलेदारांचा ‘मातोश्री’वर सन्मान
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण शिवसेनेने कडवी झुंज देत अनेक जागांवर विजय मिळवला. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे आज काैतुक केले. निवडणुकीत पैशाचा महापूर आणूनही महायुतीला निष्ठेची भिंत फोडता आली नाही, असे काैतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. लोक आजही शिवसेनेकडे आशेने पाहत असून, पुढचा काळ शिवसेनेचाच आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसैनिकांना नवी ऊर्जा दिली.
रायगड आणि उरणमधील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी आज मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवणाऱया उमेदवारांचे काैतुक करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
तुम्ही खरोखरच कमाल केली. ज्या धैर्याने लढलात त्यातून आपली ताकद दिसते. कठीण वातावरणातही तुम्ही यश मिळवलात हे काैतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे विजयी उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले. आजची परिस्थिती आपल्या विरोधात असली तरी उद्याचा काळ आपलाच असेल. निराश न होता आगामी लढतींसाठी सज्ज रहा, असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे मनोबल वाढवले.
Comments are closed.