Uddhav Thackeray praises Suraj Chavan after he was released on bail in the khichdi scam case
कथित खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यानंतर सूरज चव्हाण यांची आज तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते संध्याकाळी मातोश्रीवर आल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्यात 17 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आली होती. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खिचडी घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यानंतर सूरज चव्हाण यांना अटक झाली होती. यानंतर आज सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आज तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सूरज चव्हाण हे संध्याकाळी मातोश्रीवर आल्याचे पाहायला मिळाले. (Uddhav Thackeray praises Suraj Chavan after he was released on bail in the khichdi scam case)
कोविड काळात परप्रांतीय मजुरांसाठी खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात खिचडीत माप मारण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांना 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मलिदा मिळाल्याचे सांगण्यात आले होते. यातील आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचे कंत्राट बेकायदेशीररीत्या मिळवले. शिवाय, कराराचे उल्लंघन करत दुसर्या एजन्सीला उपकंत्राटही दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी सूरज चव्हाण यांची जुलै 2023 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्याअनुषंगाने अटकेची कारवाई करण्यात आली होती. यानंतर आज सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर मिळाला आहे.
हेही वाचा – IAS Transfer : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका, प्रवीण दराडे यांच्याकडे सहकार विभागाचा पदभार
सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सूरज चव्हाण यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य न आढळल्याने उच्च न्यायालयाने त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आज सूरज चव्हाण यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली. यावेळी तुरुंगाबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अनिल परब आणि स्थानिक आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.
सूरज चव्हाण यांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक
जामिनावर सुटका झाल्यानंतर सूरज चव्हाण हे कुटुंबासह आज संध्याकाळी मातोश्रीवर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई, बाबा, पत्नी आणि दोन्ही मुले उपस्थित होती. मातोश्रीवर पोहचताच आमदार आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची गळाभेट घेतली. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांचे कौतुक करताना म्हटले की, मला खरोखरच सूरज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा अभिमान आहे. खरंच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला हवा, त्याचे एक उत्तम उदाहरण सूरजने सर्वांसमोर ठेवले आहे. सर्वच लोक विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही, हे एका कडवट, कट्टर आणि सच्च्या शिवसैनिकाने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा – BMC : आरोग्य खात्यासह इतर गोष्टींसाठी बीएमसी मोडणार कोटींच्या मुदत ठेवी
Comments are closed.