केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला. खरिपाचा हंगाम गेला. सरकारने एक पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. आजही शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी आहे. अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे. या पाहणी पथकाचा दौरा हा केवळ दोन तीन दिवसांचा आहे. दोन-तीन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा हे केंद्रीय पथक कसा करणार? कुठे नेमकं जाणार? त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार? पंतप्रधान आपल्या मुख्यमंत्र्यांना बोलले होते की, तुम्ही प्रस्ताव पाठवा. मला वाटत नाही अजून राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला.

पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे अवघे दोन रुपये आणि काही पैसे आपल्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळाले आहेत. म्हणजे ही थट्टा सुरू आहे. कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता. त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे? आता जो रब्बीचा हंगाम येतोय त्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार? कारण जमीनच वाहून गेलीय. मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की, कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत. मग आता जर का कर्जमाफी केली तर, बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही, हे कोणंत गणित आहे? कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं. त्यांनी त्याचाही खुलासा केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

माझं स्पष्ट मत आहे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या हिवाळी अधिवेशनात कोणताही अभ्यास न करता, कोणीही मागणी न करता मी माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंतचं पीक कर्ज हे माफ केलं होतं. कर्जमुक्त केलं होतं. आता ती सिस्टीम लागलेली आहे. ती माहिती गोळा झालेली आहे. डेटा सगळा तसाच आहे मग जी योजना आम्ही यशस्वीपणे अंमलात आणून दाखवली होती तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आता जाहीर का करू नये? आता जाहीर करू शकता ते कारण सगळी माहिती सरकारकडे आहे. आजही मी कुठे गेलो तर शेतकरी सांगतो साहेब तुम्ही आमची कर्जमाफी केली होती. या सरकारला करायला लावा. आम्ही कर्जमाफी केली होती हे लोकांनी मान्य केलेलं आहे. आम्ही कोणत्याही अटी-शर्ती, अभ्यास आणि कोणतीही परदेशी समिती आमच्याकडे नव्हती, सगळं स्वदेशी होतं. आणि शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणाने कर्जमुक्ती करून तसे वागलो तसंच हे सरकार आता का वागत नाही? असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावर जाणार आहे. तिथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील. शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे. जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्यांना मिळतील. काही हजार कोटी रुपये त्यांनी इथून तिजोरीतून जारी केले असे म्हणतात तर, मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणा आहे. मिळाले असतील तर आनंद आहे. नुसतं काहीतरी आगपाखड आणि टीका करायला म्हणून मी जाणार नाहीये. पण मिळाले पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, आज शेतकऱ्याला बाकी मदतीची गरज आहेच. पण त्याच्या आधी ज्यांची जी खरवडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले आम्हाला माती द्या. ती मातीच जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार? आणि प्रति हेक्टरी ५० हजार रुपये ही शेतकऱ्याची मागणी आहे. त्याच प्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे. आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहेत. कारण खरवडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये देणार होते. आम्ही मोर्चा काढला त्या मोर्चात मागणी केली होती की, दिवाळी पूर्वी त्या तीन लाखापैकी एक लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. पुढचे नंतर देत राहा. मग तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये द्या. तर तेही दिलेत असं काही वाटत नाही. तर नेमकं सरकार काय करणार आहे? आणि शेतकऱ्यांच्या हातात आतापर्यंत घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं? गायी-म्हशी मिळालेल्या आहेत का? शेळ्या मिळालेल्या आहेत का? कोंबड्या मिळालेल्या आहेत का? मग रब्बीचा हंगाम येतोय त्याचं कर्ज कसं मिळणार? त्याचं बी-बियाणं वगैरे-वगैरे सगळ्या गोष्टी याची चर्चा करण्यासाठी मराठवाडा दौरा करणार आहे. अतिवृष्टी झाली की तेव्हड्यापुरता हा मुद्दा वरती येतो. सरकारला पण माहिती की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो. पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करावचं लागेल. शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासा शिवसेना पूर्ण ताकदीने शेतकऱ्याच्या सोबत आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला ठणकावले.

Comments are closed.