तुमचं सरकार आल्यावर ओला दुष्काळाची संज्ञा काढली का? फालतू शब्दांचे खेळ करू नका; उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फटकारलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. “ओला दुष्काळ ही संज्ञा नसेल. पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर, मग काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे एक पत्र माध्यमांना दाखवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले हे पत्र होते. या पत्रात त्यावेळी फडणवीसांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

https://www.youtube.com/watch?v=9to2vstexs

महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट आहे. गेल्या आठवड्यात मी सुद्धा अतिवृष्टी जिथे झाली त्या परिसरात जाऊन आलो, शेतकऱ्यांना भेटलो. त्यानंतरही आपल्याशी संवाद साधला. मी तर प्रांजळपणाने सरकारला हात जोडून विनंती सुद्धा केली की, या संकटात राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग कसा काढता येईल? हे पाहू शकतो. परंतु, मला नाही वाटत सरकारकडे अशी काही कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारी दिसत नाही. कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत. एक उपमुख्यमंत्री मदतीच्या पाकीटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत. आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत. म्हणजे कोणताही विषय आला की त्यावेळेला हे दुसरे उपमुख्यमंत्री दिसतच नाहीत. आणि जनता आता वाऱ्यावर पडली आहे. या जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं. आज एक बातमी आली आहे की, शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार. खरंच ही संतापजनक गोष्ट आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काही साखरसम्राट हे भाजपमध्ये गेले. आणि शेकडो, करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडून थकहमी मिळवली. आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय. ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते, त्यांची बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधी-कधी पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकावं लागतं. कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आज तर परिस्थिती अशी आहे की, डोळ्यादेखत त्यांचं पिक जमिनीसकट उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि हे कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले आहेत. रोज बातम्या येताहेत की, शेतकरी आत्महत्या करताहेत. आणि मग प्रश्न असा पडतो की, जर का साखरस्रमाट भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो, हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, म्हणजे त्यांनी जर का कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार, म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार. तर या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजपप्रणित सरकार बघतंय का? की सगळे शेतकरी भाजपमध्ये आले तर, मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. आणि त्याच्यात भरीसभर म्हणून या कारखानदारांना थकहमी मिळतेय. पण आता सरकारचा पूरभार, ज्याला पूरभार हा शब्द व्यस्थित वापरला आहे. बाधितांना मदत करण्यास उसासाठी प्रतिटन 15 रुपये कपात आणि त्याच्यात राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून, कारखानदारांकडून नाही, प्रतिटन पाच रूपये. तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये या प्रमाणे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समीतीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला साखर संघाने विरोध केलेला आहे. अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. अशावेळी कपातीमध्ये तीनपट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे सांगत विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ही कपात शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजे खड्ड्यात गेलेला शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय? अशी या सरकारची धारणा झालेली आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर नागपुरात RSS चा; हे दोनच दसरा मेळावे, इतर सर्व चोरबाजार, संजय राऊत यांचे परखड मत

तुम्हाला कल्पना आहे की, मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो. काही शेतकरी उद्विग्न झाले होते की, आम्हाला आत्महत्येशिवाय मार्ग नाही, त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की, असा कोणी आततायी विचार करू नका. साहजिकच आहे प्रति हेक्टर 50 हजार रुपये शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत. आणि त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आमची मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्याकडे काय होतं अनेकदा शब्दांचा खेळ चालतो. मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला. तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता? ठीक आहे ओला दुष्काळ ही संज्ञा नसेल. पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का? कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्षनेत्यांचं एक पत्र आहे. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते हे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. 16 ऑक्टोबर 2020 चं पत्र आहे. परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आतातरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत… परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाःकार माजवला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मदतीसाठी तो अर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. या वेदना फक्त विरोधी पक्षनेत्याला होतात? मुख्यमंत्र्याला होत नाही? पण मला झाल्या होत्या. म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढेही उद्धव ठाकरे यांनी फडणीसांचे पत्र वाचले. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. हे त्यांनी त्यावेळाला दिलेला पत्र आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पत्र माध्यमांना दाखवले. आता तेव्हा ओला दुष्काळ ही संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आल्यावरती ही संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. त्यावेळेला आमची नियत काढली. पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले.

तो मराठी संस्कृती आणि राजकारणातील साडे चारावा मुहूर्त असेल! शिवसेना-मनसे युतीवर संजय राऊत काय म्हणाले?

मुख्यमंत्री तिकडे पंतप्रधानांना भेटून आले. पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघताहेत. आणि एक फूल, दोन हाफ यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे. आता हे जे काही थोतांड आहे. केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही. केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार? आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी? त्यांचे पंचनामे होणार कधी? म्हणजे या सरकारचा निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे. एक तर तातडीने शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं पाहिजे. आणि तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाहीतर तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, काहीही म्हणा. पण शेतकरी आज संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50 हजार रुपये मदत झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

घरं-दारं वाहून गेली आहेत. पंतप्रधान आवास योजनेसारखी ग्रामीण योजना नव्याने आणा. आणि शेतकऱ्यांना पक्क्या स्वरुपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत. शाळा सुद्धा ताबडतोब सुरू केल्या पाहिजेत. ताबडतोब नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. खरवडून गेल्या आहेत. त्यांचं नुकसान फार मोठं आहे. पण शेतजमिनीबरोबर रस्ते सुद्ध वाहून गेलेले आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. ताबडोब तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत. खूप मोठं संकट आहे. आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. पण आम्ही कितीही जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करतंय किंवा करत नाहीये, हे मात्र संतापजनक आहे. नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवंय नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नुसते मुजरे मारायला दिल्लीत जाता. त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी त्यांनी दिल्लीत जायला पाहिजे.

Comments are closed.