भाजपप्रणित महायुतीला आणि त्यांच्या कुबड्यांना व्होटबंदी करा, तरच हे सरकार वठणीवर येईल; शेतकऱ्यांना आवाहन करत उद्धव ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौऱ्याचा आजचा चौथा दिवस आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी आज जालना जिल्ह्यात पाटोदामधील माव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारवर हल्ला चढवला. जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी ५० हजार रुपये मिळत नाही, वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही, बी-बियाणं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजपप्रणित आणि त्यांच्या कुबड्यांना व्होटबंदी म्हणजे मतबंदी करा. तरच हे सरकार वठणीवर येईल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
ज्या सरकारने निवडणूक प्रचारात जाहीर केलं होतं की हे सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करणार, आताच ती वेळ आहे सातबारा कोरा करण्याची. पण आता वेगळंच काहीतरी दिसतंय. ते मुहूर्त शोधत बसलेत. आता मधल्या काळात एक आंदोलन उभं झालं का केलं होतं? देव जाणे. पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिला आहे. आपण बघाल तर शेतकरी बिचारे असहाय्यपणे पुन्हा पुढच्या रब्बीच्या हंगामाला लागले आहेत. मग आता पंचनामे झालेले नाहीत. आता पंचनामे करायला गेलं तर काय रिपोर्ट देणार? केंद्राचं पथक आलं कधी, गेलं कधी कोणालाच कळलं नाही. मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार? सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले. नुकसान भरपाई मिळणार कशी? असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले. आणि कोणाला सहा रुपये, कोणाला दोन रुपये, कोणाला २१ रुपये मदत दिली. नुकसान भरपाई तर दूर कर्ज डोक्यावरती चढलं आहे. रब्बीचं कर्ज मिळणार की नाही मिळणार? त्याच्यासाठी गहाण काय टाकणार? खरवडून गेलेली जमीन बँक गहाण म्हणून स्वीकारणार का? आणि आधीच ती गहाण टाकली असेल तर दुबार पेरणी सारखी दुबार गहाण घेणार का? म्हणजे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून त्यांनी ज्यावेळेला जूनचा मुहूर्त काढला तेव्हाच दोन-तीन प्रश्न उपस्थित केले होते की जूनमध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायचे की नाही? नवीन कर्ज मिळणार की नाही? नवीन मिळालेलं कर्ज फेडायचं की नाही फेडायचं? कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगताहेत जूनमध्ये कर्जमुक्ती करणार दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री बोलताहेत की तुम्हाला सगळचं फुकट पाहिजे का, तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा. नक्की काय करायचं शेतकऱ्याने? हे कळेनासं झालेलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मोठ्या आकर्षक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं ३१ हजार ८०० कोटींचं आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, हे इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. कारण तुम्ही साक्ष आहात, तुमच्या कॅमेऱ्याने सगळ टिपलेलं आहे. कशी शेतकरी व्यथा मांडताहेत, कसे आजोबा बोलातहेत, कसे इतर तरुण बोलताहेत हे सगळं माध्यमांनी जनतेसमोर आणलं. ही वस्तुस्थिती सांगण्याचा माझा प्रयत्न होता. मी इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही. सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या व्यथा या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा चार दिवस संवाद दौरा केला. अजून दोन बैठका राहिल्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पंचनामे झालेले नाहीत. खासदार संजय जाधव यांच्याकडे एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. कदाचित ती त्याची सुद्धा मजबुरी असेल. कारण वरनचं काही आलेलं नाही तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्याच्यामुळे वरनचं पैसे आले नसतील तर तहसीलदार काय करणार? पण तहसीलदार मग्रुरीने वागत असेल तर त्याला उचलून मुख्यमंत्र्यांकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काही आव आणि जे काही सोंग आणलंय हे किती बोगस आहे. हे सरकार कसं दगाबाज आहे? या सरकारचं पॅकेज नुसतं बकवास आहे हे या दौऱ्यातून जनतेसमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
मी दोन कार्यक्रम सांगितले आहेत. आता शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. शेतकऱ्याची कर्जमुक्तीची मागणी पूर्ण झाली पाहिजे. ५० हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. पण त्यापलिकडे सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही? पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्ट वर पाठवलेत की नाही? रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे? आणि ती मिळालेली आहे की नाही? हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणुका आल्यानंतर फसवी आश्वासनं दिली जातात, थापा मारल्या जातात. मग त्या लाडक्या बहिणीचं असेल किंवा कर्जमाफीचं असेल. पण निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं की ज्याच्या नावावरती जमीन आहे त्याला अगदी महिला असतील तरी मैलोनमैल प्रवास करून आंगठे द्यायला, केवायसी करायला तिकडे यावं लागतं. अनेकदा सर्व्हर डाउन म्हणून परत जावं लागतं. हे सगळं बघितल्यानंतर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती तसं शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केली की तुम्ही तुमच्यातले जात-पात धर्म सगळे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी ५० हजार रुपये मिळत नाही वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही, बी-बियाणं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजपप्रणित आणि त्यांच्या कुबड्यांना व्होटबंदी म्हणजे मतबंदी करा. तरच हे सरकार वठणीवर येईल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
Comments are closed.