मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल, हे दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू; उद्धव ठाकरे यांचा इशारा
मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैवं दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या गेल्या. ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने ते साम, दाम, दंड, भेद याच्या पलिकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
ज्या-ज्या मतदारांनी जिथे-जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या युतीला मतदान केलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या गेल्या. ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंड भेद याच्या पलिकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला. धाकदपटशा, पैशाची लालुच दाखवली, आमिष दाखवलं, काही आमच्या शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा गेल्या. काहीजणांना अटका केल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. कल्याण-डोंबिवली असेल, ठाणे असेल तिथल्या उमेदवारांना पैशाची आमिषपण देण्यात आली. काही ठिकाणी जोरजबरदस्तीने उमेदवाऱ्या मागेही घ्यायला लावल्या. या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या-ज्या उमेदवारांनी ही लढत दिली. आणि ज्या-ज्या मतदारांनी निर्भयपणाने हे मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आजतरी गाठू शकलो नाही. पण या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही यश शिवशक्तीने मिळवलेलं आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे हे नक्कीच. कारण त्यांनी एग्झिट पोलचे आकडे किंवा आणखीन काही गोष्टी असतील या सर्व म्हणजे एकही प्रयत्न असा त्यांनी सोडला नाही की जिथे शिवसेना नामोहरम होईल. एका गणिताचं काय उत्तर मिळालेलं नाही. विधानसभेला मोदींची सभा झाली होती शिवतीर्थावर, खुर्च्या रिकाम्या होत्या. याही वेळेला मी आणि राज पहिल्यांदा शिवाजीपार्कला एका व्यासपीठावर एकत्रित आलो, एकत्रित यापूर्वीसुद्धा होतो शिवसेनाप्रमुख होते तेव्हा. पण एका व्यासपीठावरून आम्ही आणि आदित्यानेही भाषण केलं. आपण सगळे साक्षी आहात शिवाजीपार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती, म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही. पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्यांदा आम्हाला कळलं. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? हे एक न सुटलेलं कोडं आहे, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
एकूणचं काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केलं, गेल्या चार दिवसांमध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसांपुरता वाटप नव्हता गेले चार वर्षे हे पैसा पेरत होते. आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मुंबईपुरता बोलायचं झालं तर जवळपास आर्धेअधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेलेत. चार वर्षे त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली अमाप पैसा वाटला. निवडणुकीच्या तोंडावर प्रेशर कुकर, मिक्सर, साड्या म्हणजे प्रचंड, हा पैसा येतो कुठून? या पैशाचा सोर्स काय, त्या सोर्सच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लागत कसे नाही? आणि एवढं करूनही अमाप पैसा वाटला जातो. साधारणतः २०१५ साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबवावा म्हणून मोदींनी जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का? याचं उत्तर सुद्धा हे कोणीतरी शोधलं पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे-जिथे शिवसेनेला मतदान केलंय त्या मतदारांनी दाखवून दिलंय. थोडक्यात शिवसेना कगदावर संपवली असेल पण, जमिनीवरची संपवू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा कागदावरती आहे पण, जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आणि आजही शिवसैनिक महिला-पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे आहेत. प्रचंड पैशाच्या धबधब्या समोर निष्ठा कशी ताठ मानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे. मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मला मुंबईकरांकडून आणखीन आपेक्षा नक्कीच होती. कारण २५ वर्षांत जी काही आम्ही सेवा केली, ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच. कोविड काळात जे काही काम केलं मुंबई मॉडेल याची जगभरात प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की मुंबईकर भरघोस आशीर्वाद देतील. आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावर दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत. विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा, या मराठी माणसाने शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे. यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत. आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे? कसे-कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत? याचा भंडाफोड तर नक्कीच होईल. पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू. आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैवं दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू, असा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Comments are closed.