Uddhav Thackeray question to Ajit Pawar on Dhananjay Munde resignation
धनंजय मुंडे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपण राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. यावरून आता राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे.
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आल्याचे आजवर बोलले जात होते. पण आता तर या हत्येचे व्हिडीओ आणि फोटोसुद्धा समोर आले आहेत. सोमवारी (ता. 3 मार्च) रात्री हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर अखेरीस मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून त्यांचा हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांकडून स्वीकारण्यात आला आहे. पण मुंडेंच्या राजीनाम्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का नाही घेतला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Uddhav Thackeray question to Ajit Pawar on Dhananjay Munde resignation)
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी (ता. 3 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरुवातीला विधानसभेतील विरोधी पक्षासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती दिली. याबाबत ते म्हणाले की, आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे ही लोकशाही मूल्यांचा पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. बजेटपूर्वी विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून तशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सुद्धा विचारणा करण्यात आली. याबाबत ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर जे काय बोलायचे होते ते सगळ्या माझ्या आमदारांनी बोलले आहे. आता हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडीओ किंवा फोटो आले आहेत ते आधी सरकारकडे आले होते की नव्हते? आता फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे. अजून पुढे अनेक गोष्टी येतील. मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधत आहेत का? असा सवाल ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आला.
तसेच, धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर की आजारापणामुळे घेण्यात आला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला असता ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. तर अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकतेचा मुद्दा असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का घेतला नाही? मुंडेंनी तब्येतीचे कारण सांगितले असेल आणि आता जर एवढे व्हिडीओ आणि फोटो समोर आले असतील तरीही त्या गोष्टीवरून त्यांचा राजीनामा का घेतला नाही हे स्पष्ट करावे, असे आव्हानही ठाकरेंकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून याबाबत काही उत्तर देण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.