…आणि पत्रकार परिषद ‘जनसभा’ ठरली! मुंबईत आवाज मराठीचा!

शिवसेना व मनसे युतीच्या घोषणेच्या निमित्ताने मुंबईत आज पुन्हा एकदा मराठीचा आणि ठाकरेंचा आवाज घुमला. युतीच्या घोषणेसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याने वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलबाहेर शिवसैनिक, मनसैनिक व मराठीप्रेमींची गर्दी उसळली होती. पत्रकार परिषदेचे सभागृह माध्यम प्रतिनिधी आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब भरले होते. आतमध्ये शिरायला जागा नव्हती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते बाहेरच उभे होते. युतीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. गगनभेदी घोषणा झाल्या. सभागृहाच्या बाहेर ढोलताशांचा गजर झाला. भगव्या झेंडय़ावरील मशाल आणि मनसचे इंजिन एकत्र डौलत होते. कार्यकर्त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि त्यांनी मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. अलोट गर्दीमुळे ही पत्रकार परिषद अक्षरशः जनसभाच ठरली.

पत्रकार परिषदेच्या निमित्ताने दक्षिण मुंबई भगवामय झाली होती. वरळीकडे जाणारे सर्व रस्ते शिवसेना व मनसेच्या भगव्या झेंडय़ांनी फुलून गेले होते. कार्यकर्त्यांचे जथे हातात भगवे झेंडे घेऊन आणि घोषणा देत वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलकडे येत होते. आवाज मराठीचा… मुंबईत चालणार फक्त ठाकरे ब्रँड… अशा घोषणा दिल्या जात होत्या.

Comments are closed.