BLOG: अजि म्या ठाकरे बंधूंना एकत्र पाहिलं, पण…

उधव ठाकरे राज ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा एकत्र येतात: खरं तर दिवस ऐन पावसाचे… सकाळपासून आकाशात ढगांनी गर्दीही केली होती. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेचं नशीब खरोखरंच बलवत्तर, की पावसानं मराठीच्या अजेंड्यावर बोलावण्यात आलेल्या विजयी मेळाव्यावर मेहरनजर केली. उद्धव आणि राज ठाकरेंनी बोलावलेला हा विजयी मेळावा वरळीच्या एनएससीआय डोमच्या इनडोअर सभागृहात झाला असला तरी या मेळाव्याच्या निमित्तानं मुंबई आणि आसपासच्या महानगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अमाप उत्साह होता. त्या उत्साहावर आणि विजयी मेळाव्याच्या उत्सवी वातावरणावर पाणी फेरलं जाणार नाही, याची काळजी वरुणराजानं घेतली. त्यामुळं दोन्ही ठाकरेंवरच्या प्रेमापोटी भल्या सकाळी वरळीच्या दिशेनं निघालेला शिवसैनिक आणि मनसैनिक वेळेच्या आधीच एनएससीआय डोममध्ये दाखल झाला.

मंडळी, या विजयी मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेवर नाव मायमराठीचं असलं तरी, गावागावात मेळाव्याविषयी निर्माण झालेली उत्सुकता ही उद्धव आणि राज ठाकरे हे एका सामाजिक, सांस्कृतिक आणि म्हटलं तर राजकीय मुद्द्यावर 19-20 वर्षांनी एकत्र येतायत याचीच होती. त्यामुळं दोन ठाकरी तोफा पाठोपाठ धडाडणार म्हटल्यावर सारी माध्यमं आणि राजकीय निरीक्षक मंडळी कान टवकारून बसली होती. उद्धव आणि राज ठाकरे साधारण साडेअकराच्या सुमारास या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतील, असा अंदाज होता. पण त्याच्या तीन तास आधीपासूनच म्हणजे, सकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासून एनएससीआय डोमच्या आसपास जणू मराठीचा सण साजरा होत होता. लोक वाजतगाजत… प्रचंड उत्साहात एनएससीआय डोम परिसरात पोहोचत होते.

विजयी मेळाव्यावर छाप मनसेची

संदीप देशपांडे, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार, नितीन लाड, मनोज चव्हाण, बंटी म्हशीलकर आदी राज ठाकरेंची सरदार मंडळी आणि त्यांच्या शिलेदारांची घरचं कार्य असल्यासारखी धावपळ सुरु होती. शिवसेनेच्या आशीष चेंबूरकरांसारखी ज्येष्ठ मंडळीही त्या कार्यात सामील झाली होती. पण एनएससीआय डोमचं आवार असो किंवा आतलं सभागृह असो, मराठी विजयी मेळाव्यावर छाप ही मनसेच्या इव्हेण्ट मॅनेजमेंटची होती. इनडोअर सभागृहातही नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आणि शिरीष सावंत या ‘राज’मान्य सरदारांचीच सद्दी होती. कदाचित सरासरी वय लक्षात घेतलं, तर पहिल्या फळीतील मनसैनिक हा तुलनेत वयानं अधिक तरुण असल्यानं धावपळीची कामं त्यांनी आपल्या शिरावर घेतली असावीत. पण वरळीगावातल्या आस्तिक ब्रास बॅण्डनं लोकप्रिय मराठी गाण्यांचा ठेका धरताच, त्या तालावर बेभान होऊन नाचणारी मंडळीही ‘राज’दरबारातील पहिल्या फळीची नेतेमंडळी होती. अर्थात सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांच्यासारख्या महिला नेत्यांनी महिला कार्यकर्त्यांच्या साथीनं फेर धरून, आपल्या पक्षाच्या पुरुष नेत्यांचं हातचं राखलेपण फार जाणवू दिलं नाही.

मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना आणि मनसे नेत्यांच्या चालण्याबोलण्यात आणि वागण्यात दिसलेली तफावत योगायोगानं त्यांच्या सर्वोच्च नेत्यांमध्येही जाणवली. पण फरक इतकाच होता की, व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्थितप्रज्ञ होते आणि उद्धव ठाकरे यांच्या भावना उचंबळून आल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळंच तुडुंब भरलेल्या सभागृहाला राज ठाकरे हे नमस्कार करत असताना, उद्धव ठाकरे यांचा व्यासपीठावर झालेला प्रवेश हा राज यांना आलिंगन देण्याच्या अविर्भावातच झाला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून छायाचित्रकारांना हवी असलेली पोज दिली खरी, पण त्या पोजमध्येही उद्धव ठाकरे यांच्यामधला जोश आणि राज ठाकरे यांच्यामधली संयमी भावनाच अधिक प्रकर्षानं जाणवते.

विराट कोहली आणि स्टीव्ह वॉ

मंडळी, मला दिसलं किंवा मला जाणवलं त्याच्याशी तुम्ही प्रत्येकजण सहमत व्हाल की नाही, याची मला कल्पना नाही. पण गेल्या 36 वर्षांत मी प्रामुख्यानं क्रीडा पत्रकार म्हणून वावरल्यानंच उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या निव्वळ त्यादिवशीच्या वागण्याची तुलना ही अनुक्रमे आपला विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉशी करण्याचा मोह मला होतोय. विराट कोहलीनं आपल्या आजवरच्या कारकीर्दीत त्याच्या मनातली कोणतीही भावना कधी मैदानातही दडवली नाही. उद्धव ठाकरे हे मराठीच्या विजयी मेळाव्यात जणू विराट कोहलीच्या अविर्भावात खेळले. कुणीही निंदा, कुणीही वंदा… आता मला काहीही फरक पडणार नाहीय, हा त्यांचा अॅप्रोच होता. त्याउलट राज ठाकरे हे कौटुंबिक आणि राजकीय समूह फोटोचे क्षण सोडले तर अख्ख्या विजयी मेळाव्यात स्टीव्ह वॉच्या स्थितप्रज्ञतेनं वावरले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातल्या राजकीय उखाळ्यापाखाळ्यांना कॅमेरा राज ठाकरेंचा क्लोज अप हमखास दाखवायचा. पण त्यांच्यातल्या राजकीय नेत्यानं आपल्या चेहऱ्यावरचं गांभीर्य एकदाही अजिबात बदलू दिलं नाही.

उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू तब्बल 19-20 वर्षांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यांना एकत्र आणणारा मराठीचा मुद्दा इतका ठोस होता की, मधली अहंकाराची, अपार रागाची, एकमेकांसोबतच्या पराकोटीच्या स्पर्धेची 19-20 वर्षे सहज गळून पडली होती. दोघं अजूनही जणू एकाच पक्षात सुखासमाधानानं नांदतायत, इतक्या सहजतेनं एकमेकांसोबत वावरत होते. पण विजयी मेळाव्यामागचा मराठीचा मूळ मुद्दा हा राज ठाकरेंनीच आपल्या भाषणातून आणि कमालीच्या फोकसमधून हरवू दिला नाही. केवळ भाषणाची सांगता करताना बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण त्याची सांगड ही मराठीच्या मुद्द्याशीही घालता येऊ शकते. त्याउलट उद्धव ठाकरेंनी आपण एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी असं सांगत एका पद्धतीनं राजकीय युती साकारण्याबाबत आपल्या मनातील संकेत वारंवार दिले. त्यांच्या या उद्गारांना उपस्थितांमधून प्रचंड प्रतिसाद लाभायचा. पण राज ठाकरे मात्र त्यावेळी जणू स्टीव्ह वॉच्या स्थितप्रज्ञतेनं तो अनुभव घेत होते.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतल्या जुन्या संदर्भाचा हवाला देतानाही राज ठाकरे यांना त्यात सांगून जमेस धरले. एकसंध शिवसेनेतून वेगळं होऊन राज ठाकरेंनी आजवर केलेल्या राजकीय प्रवासाचा त्यांनी त्यांचं कर्तृत्व असा गौरवानं उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी अनुक्रमे अनाजीपंत आणि गद्दार या शब्दांचा वापर केला. त्यामुळंच उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा असला तरी त्यांच्या भाषणाचा फोकस मराठीच्या मुद्द्यावरून ढळला अशी टीका होऊ शकली. वास्तविक गेल्या तीन वर्षांत महायुतीतल्या छोट्या-बड्या नेत्यांकडून झालेली जहरी टीका आणि मूळ शिवसेना पक्षच हातातून काढून घेण्याचा झालेला प्रकार हे सारं कुणाच्याही जिव्हारी लागणारं आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे मनात निर्माण झालेली कटुतेची भावना त्यांच्याकडून या व्यासपीठावरही अगदी सहज उमटली असावी. तीही कोणताही आडपडदा न ठेवता भर मैदानात विराट कोहली व्यक्त होतो तशी.

मराठी माणसाच्या आशेचं काय?

मंडळी, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा संबंध त्यांच्यामधल्या संभाव्य राजकीय युतीशी जोडता येईल का, हे अजिबात सांगता येणार नाही. कारण राजकारणात खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. त्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यासोबत, आपल्या बाजूनं एकत्र यायला आणि एकत्र राहायला काहीही अडचण नाही, हे जाणीवपूर्वक दाखवलं असण्याची शक्यता आहे. कदाचित राज ठाकरे यांनी ते होण्याची शक्यता आधीच ओळखून, स्टीव्ह वॉच्या स्थितप्रज्ञतेचा मुखवटा आपल्या चेहऱ्यावर चढवला असण्याचीही शक्यता आहे. पण राजकीय शक्यतांच्या या खेळात त्या भोळ्याभाबड्या मराठी माणसाचं काय?

मला आणि माझ्या कुटुंबाला प्रशासकीय व्यवस्थेकडून काय मिळेल किंवा मिळणार नाही, याची पर्वा न करता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन सच्च्या राजकीय वारसदारांनी एक व्हावं म्हणून मराठी माणसांनी हजारोंच्या संख्येनं एनएससीआय डोमची वारी केली होती. राज्यभरातली करोडो मराठी माणसं मोठ्या भक्तिभावानं डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा वृत्तवाहिन्यांना चिकटून बसली होती. ठाकरे बंधूंना पुन्हा एका व्यासपीठावर पाहायला मिळणार या निव्वळ कल्पनेनंच भोळाभाबडा मराठी माणूस मोहरून गेला होता. त्या कल्पनेनंच मराठी माणसाच्या वळलेल्या मुठीत नवी ताकद आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू आता नक्की एकत्र नांदतील, अशी खूणगाठ मनाशी बांधून हा मराठी माणूस ब्रास बॅण्डच्या तालावर बेभान होऊन नाचला. आदित्य आणि अमित ठाकरेंनी गळाभेट घेतली, त्याचाही या मराठी माणसाला प्रचंड आनंद झाला. त्यामुळं एनएससीआय डोममधून परतीच्या प्रवासासाठी गर्दीतून आणि वाहतूक कोंडीतूनही वाट काढताना, हा मराठी माणूस किंचित हवेतच तरंगत होता. त्या मराठी माणसाला त्याच्या लाडक्या उद्धव आणि राज ठाकरेंनी एक स्वप्न दाखवलं होतं… मराठी माणसाच्या एकजुटीचं. त्या एकजुटीच्या बळावर अख्खी राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था उलथवून टाकण्याची क्षमता आपल्या अंगी निर्माण झाल्याचं त्या मराठी माणसाला जाणवत होतं. आणि त्या कल्पनाशक्तीतही इतकी मोठी ताकद होती, की भोळ्याभाबड्या मराठी माणसाला सकाळपासूनच्या तहानभुकेचाही विसर पडला होता. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ही पुण्याई त्यांच्या सच्च्या राजकीय वारसदारांनी यापुढे तरी कायम लक्षात घ्यायला हवी… नाही का?

Comments are closed.