Uddhav Thackeray Shivsena UBT press conference on Balasaheb Thackeray Memorial asj
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “श्रेयवाद झाला नाही पाहिजे. खासकरून ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडले, त्यांनी याबद्दल काहीच बोलू नये,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला. तसेच, फक्त पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे, असेदेखील विधान त्यांनी केले. (Uddhav Thackeray Shivsena UBT press conference on Balasaheb Thackeray Memorial)
हेही वाचा : Balasaheb Thackeray National Memorial : आदित्य ठाकरे म्हणतात, बाळासाहेबांनी जीवनात काय घडवलं…
– Advertisement –
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना स्मारकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “फक्त पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला काय दिले? तेच हे स्मारक देऊ शकेल, असा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच इथे काय काय असणार? याबाबत आम्ही नंतर तुम्हाला सविस्तर सांगू” असे विधान त्यांनी यावेळी केले. तसेच, ते म्हणाले की, “चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र कधी लिहिले नाही. त्यावर त्यांना विचारले जात होते. ते म्हणत होते, मी कपाटातील माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते.” असे ते म्हणाले.
या दिवशी स्मारक लोकांसाठी खुले होणार
“23 जानेवारी 2026 पर्यंत हे स्मारक लोकांसाठी खुले होणार आहे. आम्ही हे स्मारक शिवसेनाप्रमुखांवर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाले. पण ते काम सोपे नव्हते. अनेक अडचणी होत्या. आता टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे. आराखडा तयार झाला आहे.” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना ते म्हणाले की, या स्मारकासाठी एकही झाड तोडलेले नाही. बाळासाहेबांनी नेहमी पर्यावरणावर आणि झाडांवर प्रेम केले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. “गेली काही वर्ष बाळासाहेबांच्या स्मारकाचा काम सुरू होते. ज्या जागेवर बाळासाहेबांचे स्मारक होत आहे, त्याच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचेही स्मारक आहे. महापौर बंगला ही आमच्यासाठी फक्त एक वास्तू नाही तर आमचे त्याच्याशी एक भावनिक नाते आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झाल्या आहेत. म्हणून या वास्तुचे वैभव जपून तिथे काम करणे अवघड होते.” असेदेखील उद्धव ठाकरे यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.
Comments are closed.