थापेबाज सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकर्यांची एकजूट महत्त्वाची! – उद्धव ठाकरे
थापेबाज सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकर्यांची एकजूट आता महत्वाची असून, सर्व हेवेदावे दूर ठेऊन संघटीत होऊन तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. तुमच्या नुकसानीची भरपाई पूर्णपणे मिळण्यासाठी मी संघर्ष करत आहे, तुम्ही पेटून उठा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांशी सविस्तर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकर्यांच्या उदध्वस्त झालेल्या जीवनात त्यांना मदत करण्याऐवजी या भागातून समृध्दी महामार्ग होण्यासाठी व कंत्राटदारांचे भले करण्यासाठी ८६ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेले ३२ हजार कोटींचे पॅकेज नेमके गेले कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, संबंध मराठवाडा फिरत आहे, कुठेही शेतकरी समाधानी नाही, पिकविम्यांची तुटपुंजी मदत, जाहीर केलेल्या अनुदानापैकी थोडीफार मदत करुन शेतकर्यांची क्रूरचेष्टा हे सरकार करत आहे. शेती उदध्वस्त झाली, पिके वाहून गेली, केळी उदध्वस्त झाली, बागायती पिकांचे नुकसान झाले. तरीही या सरकारला दया आली नाही, शक्तीपीठाच्या माध्यमातून त्याचे नियोजन होण्यापूर्वीच आजूबाजूच्या जमिनी बड्या मंडळींनी खरेदी केल्या. शेतकर्यांच्या मदतीपेक्षा समृध्दी महामार्ग या सरकारला महत्वाचा वाटतो आहे.
दिवाळी गेली तरीही मदत नाही. त्यामुळे आता शेतकर्यांची एकजूट महत्वाची असून, सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व शेतकर्यांनी संघटीत होऊन तहसीलदार आणि संबंधितांना घेराव घाला, आणि मदत मिळेपर्यंत तेथून हालू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. आनंदाचा शिधा बंद झाला, शेतकऱ्यांसाठी कळवळा म्हणून अन्नधान्याच्या पॅकेटचा गाजावाजा केला, मात्र किडलेले धान्य देऊन, सडलेले तांदुळ देऊन शेतकर्यांची थट्टा केली. याच तांदळाची खिचडी संबंधितांना खाऊ घाला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
झेंडावंदनासाठी येणारे पालकमंत्री आता गायब झाले, तिकडे मुख्यमंत्री बिहारमध्ये जाऊन पंतप्रधानांचे गोडवे गात आहेत. मात्र शेतकर्यांना वार्यावर सोडण्यात आले आहे. सरकारची मदत येईल म्हणून डोळ्यात तेल घालून तुम्ही वाट पाहत आहेत, मात्र ती मदत आली नाही, त्यामुळे तुमच्यासाठी जे जे करायचे आहे, ते मी करायला तयार आहे, आता पेटून उठा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. ‘मनी की बात’ करणार्या केंद्रातील व राज्यातील सरकारला आता ‘जन की बात’ काय आहे हे सांगण्याची वेळ आली असून, जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करा आणि महायुतीला येणार्या निवडणुकीत मदत मिळेपर्यंत मतदान करणार नाही, असा निर्धार करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
यावेळी शेतकरी हरिश्चंद्र कदम, बालाजी खंकरे यांच्यासह अनेक शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडून शक्तीपीठाच्या माध्यमातून शेतकरी उदध्वस्त झाला आहे, आता अतिवृष्टीतून त्याला सावरण्यासाठी सरकारही गाजर दाखवत आहे, गुरे गेली, ढोरे गेली, शेती उदध्वस्त झाली तरीही या सरकारला कळवळा आला नाही, फसवी पिक विमा योजना, मदतीचे गाजर यामुळे शेतकरी संतापला आहे. तो निश्चित पेटून उठणार, अशा भावना या शेतकर्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी या भागातील शेतकर्यांची व्यथा मांडली. तर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील भयावह परिस्थितीबाबत संपूर्ण माहिती देवून शेतकर्यांना पेटून उठण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर, नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख सुनिल पाटील, शहरप्रमुख काजी सल्लाउद्दीन, रमेश क्षीरसागर, सुनिल बोबडे, ओम नागलमे, अमोल बारसे, संभाजी देशमुख, कुंडलिक कल्याणकर, भगवान कल्याणकर, गजानन गव्हाणे, अशोक डांगे, रुपेश देशमुख, नवज्योतसिंघ गाडीवाले, मारोतराव कल्याणकर, गिरजाराव नरोटे, गजानन हापगुंडे, श्याम गिरी, सदाशिवराव देशमुख, अशोक कपाटे आदी उपस्थित होते.
Comments are closed.