…तोपर्यंत सरकारला सोडायचं नाही! उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा

जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख राजू वैद्य तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

आज दिवाळीचा पहिला दिवस असून दिवाळीच्या शुभेच्छा देताना मला मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकरी दिसतोय. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे कुणी उभे राहो न राहो, पण शिवसेना त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, मी आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यात आलो होतो. तेव्हा मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होतो की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचे नाही. कारण सध्याचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. सरकारची ‘अशी ही फसवा फसवी’ सुरू आहे. खरडून गेलेल्या जमिनीला त्यांनी तीन-साडे तीन लाख रुपये जाहीर केले. पण मी म्हटले होते की मदत हवी तर दिवाळीनंतर करा, पण यातील एक लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. पण सरकारने तसे केले नाही. तसेच कर्जाचे पुनर्गठण नाही तर कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी दिवाळीनंतर आपण पुन्हा मराठवाड्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

दिवाळीनंतर मराठवाड्यात येणार असलो तरी तालुका पातळीवर शिवसेनेची पथके पाहिजे. सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, ते शेतकऱ्याला मिळते की नाही हे पाहिले पाहिजे. शेतकऱ्याला ते मिळवून देण्याचे काम शिवसैनिकांनी करायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी शेतकऱ्यांचा सोबती असून शेतकऱ्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. मराठवाडा, महाराष्ट्राने या सरकारचा अनुभव घेतलेला आहे. या सरकारला आपल्याला घालवायचे आहेच, पण सर्वप्रथम संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मैदानात उतरूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Comments are closed.