एखाद्याला जगणं नकोसं होईल इतके आरोप करू नका! अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांची आदरांजली

‘माणूस आपल्यासोबत असला की त्याचे महत्त्व कळत नाही, पण तो आपल्यातून गेल्यावर त्याची किंमत कळते. त्यामुळे एखाद्याला जगणे नकोसे होईल इतके आरोप करू नका. मर्यादा पाळा,’ अशा शब्दांत भाजपला सुनावत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. ‘अजितदादांच्या रूपाने आपण एक विश्वासू सहकारी, दिलदार मित्र आणि उमदे नेतृत्व गमावले आहे,’ अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘दादांच्या रूपाने आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. ही भावना फार थोडय़ा व्यक्तींबद्दल वाटते असे सांगत, उद्धव ठाकरे यांनी अजितदादांची धडाकेबाज कार्यशैली, सडेतोड भूमिका, स्पष्टवत्तेपणा व प्रशासकीय काौशल्याचे कौतुक केले. ‘एखाद्या व्यक्तीला कधी-कधी इतपं बदनाम केलं जातं की त्याला जीव नकोसा वाटावा. अजितदादांच्या बाबतीत काहीसं हेच झालं. मात्र ते खचले नाहीत. एखादा कमजोर मनाचा असता तर त्याने जीव दिला असता. पण अजितदादांनी त्यांच्यावरील आरोपांना कामातून उत्तर दिलं. उलट ज्यांनी त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांनीच अजितदादांना सहकारी म्हणून स्वीकारलं, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

निळा देसाईंसह इतर सदस्यांनाही आदरांजली

उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधान परिषदेचे माजी दिवंगत सदस्य स्वरूपसिंग नाईक, अशोक मोडक, गंगाधर पटणे, नीला देसाई यांनाही श्रद्धांजली वाहिली. ‘ही सगळी धडपड करणारी माणसे होती. अशी माणसे आपल्यातून अचानक निघून जातात, तेव्हा दुःख व्यक्त करणे एवढेच आपल्या हातात असते’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अजितदादांचा शिस्तशीरपणा शिवसेनाप्रमुखांसारखा

माझ्या कारकिर्दीची सुरुवात अजितदादांचा पक्ष व विचारसरणीच्या विरोधात होती. आम्ही एकत्र येऊ, असे कधी ध्यानीमनीही नव्हते. आम्ही अनपेक्षितपणे एकत्र आलो. मला प्रशासनाचा अनुभव नसताना मुख्यमंत्री म्हणून विधीमंडळात आलो. कामकाज कसे चालवायचे माहीत नव्हते. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी मला खंबीर साथ दिली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्व विषयाचा गाढा आणि सखोल अभ्यास करणारा दादांसारखा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच मिळतो. त्यांचे काम शिस्तशीर होते. त्यांच्या टेबलावरील कागदपत्रे व्यवस्थित काटकोनात असायची. त्यांची ती पद्धत शिवसेनाप्रमुखांच्या शिस्तीची आठवण करून द्यायची,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांनी मोठय़ा वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण केली होती,’ असेही त्यांनी सांगितले.

विश्वासू सहकारी आणि दिलदार मित्र गमावला

आनंदाने भरलेली बारामती अजित पवार यांच्या निधनाने पूर्णपणे पोरकी झाली आहे. अधिवेशनाची सुरुवातच आपण जड अंतःकरणाने करीत आहोत. आपले वाटणारे अजितदादा आज सभागृहात नाहीत ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. अजितदादांच्या रूपाने आपण एक विश्वासू सहकारी आणि दिलदार मित्र गमावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.