राज्यात खुलेआम भ्रष्टाचार सुरू… मुख्यमंत्री हतबल का? शेतकऱ्यांना नुसता हमीभाव नाही तर हमखास भाव पाहिजे – उद्धव ठाकरे
राज्यातील शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे. मराठवाडय़ावर आलेले संकट तर भयानक आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱयांची पिकं हातातून गेली आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या हातात पिक होतं, पण शेतकऱयांचा प्रश्न होता ‘आम्हाला हमीभाव द्या. त्यामुळे शेतकऱयाच्या हातात पीक लागलं तर हमीभाव मिळत नाही, आणि गेलं तर सगळंच गेलं. त्यामुळे नुसता हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळाला पाहिजे अशी यंत्रणा निर्माण करण्याची आता गरज असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. राज्यात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असतानाही मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. केंद्र सरकार पाठीशी आहे. तरीही मुख्यमंत्री हतबल का, असा जळजळीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
आम्ही एकत्र येण्याने विरोधकांना घाम
राज ठाकरे यांच्यासोबत संभाव्य युतीच्या चर्चेबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही 2005 मध्ये वेगळे झालो. आता एका मुद्दय़ावर आम्ही एकत्र आलो आहोत. रोज ‘आम्ही एकत्र आलो’ असं सांगण्याची गरज नाही. ‘आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. मराठी माणूस एकवटल्यावर काय होईल याची त्यांना भीती वाटते.’
लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणाची?
‘पंतप्रधान, गृहमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ हे देशाचे मंत्री नाहीत, पक्षाचे आहेत. सोनम वांगचुक यांच्यावर थेट रासुका लावला गेला. त्यांचा गुन्हा काय? ते पंतप्रधानांची स्तुती करत होते, तेव्हा देशप्रेमी होते. आता देशविघातक कसे झाले? लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर मणिपूरमध्ये कोणाची चूक आहे, आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरलेत, पण त्यावर एकही बातमी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
गद्दार, नमकहरामांना उत्तर देत नाही’
‘मी गद्दार, नमकहराम आणि हरामखोरांना उत्तर देत नाही’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाच्या रामदास कदम यांना फटकारले. ‘मला त्या गद्दाराला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय हे महाराष्ट्र व देश ओळखतो, असे ते म्हणाले.
अन्याय दिसेल तिथे लाथ मार
जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रीदवाक्य. माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं. तेच घेऊन मी पुढे चाललोय. अन्याय दिसेल तिथे लाथ मारणं हे आमचं कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजपचा समाचार घेतला.
Comments are closed.